कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडून
औसा तालुक्यातील
पिक नुकसानीची पाहणी
लातूर,दि. 16: जिल्ह्यात दिनांक 15
मार्च 2017 रोजी वादळी वा-यासह पाऊस व गारपीट
झाल्याने औसा व लातूर तालुक्यातील पिकांचे नुकसान झालेले आहे. औसा तालुक्यातील नांदुर्गा,
टाका, मासुर्डी व येल्लोरी या गावातील पिक नुकसानीची पाहणी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ
खोत यांनी आज केली.
यावेळी
अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर, औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते,
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रतापसिंह कदम, जिल्हा कृषि विकास अधिकारी (जि. प.) बी.
एस. रणदिवे, उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. मोरे, आत्माचे प्रकल्प संचालक सी. डी.
पाटील, औसा तहसिलदार अहिल्या गाठाळ, गट विकास अधिकारी तुकाराम भालके यांच्यासह नुकसानग्रस्त
शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषि
राज्यमंत्री श्री. खोत यांनी शेतक-यांच्या शेतातील गहू, मका, हरभरा, द्राक्ष, ऊस, ज्वारी
आदि पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी श्री. खोत यांनी शेतक-याच्या
पाठीशी शासन खंबीरपणे असल्याचे सांगून नुकसानग्रस्त शेतक-यांना दिलासा दिला. तसेच वादळी वा-यासह पाऊस व गारपीट मुळे झालेल्या
पिकांच्या नुकसानीचे प्रशासनाकडून त्वरीत पंचनामे करण्यात येऊन शेतक-यांना वेळेत मदत
देण्याची कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. श्री. खोत यांनी नुकसानग्रस्त
शेतक-यांशी संवाद साधून त्यांच्या पिकांच्या नुकसानीची माहिती घेवून त्यावर प्रशासनाने
त्वरित कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली.
जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी श्री. कदम यांनी औसा तालुक्यात प्राथमिक अंदाजानुसार 19 हजार
840 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. तर उपविभागीय अधिकारी
श्री. विधाते यांनी औसा तालुक्यातील 108 गावांपैकी 35 गावांना वादळी पावसामुळे नुकसान
झालेले आहे असे सांगितले. तर तालुक्यातील दोन मोठी व आठ लहान अशी एकूण दहा जनावरे दगावल्याची माहिती त्यांनी दिली.
****
Comments
Post a Comment