प्रशासनाने वस्तुनिष्ठ पंचनामे आठ दिवसात पूर्ण करुन अहवाल सादर करावा
                                           - कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत
         लातूर,दि. 16: जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीटीमूळे झालेल्या पिकांच्या व इतर नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे प्रशासनाने आठ दिवसात पूर्ण करावेत व त्याचा अहवाल त्वरित शासनाला सादर करावा, असे निर्देश कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.
            येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित पिक नुकसानीबाबत महसूल व कृषि अधिका-यांच्या बैठकीत कृषि राज्यमंत्री श्री. खोत बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर , विभागीय कृषि सहसंचालक शिरीषकुमार जमदाडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रतापसिंह कदम, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वारकड, अहिल्या गाठाळ, उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. मोरे, आत्माचे प्रकल्प संचालक सी. डी. पाटील,  जिल्हा कृषि विकास अधिकारी (जि.प.) बी. एस. रणदिवे, आदि उपस्थित होते.
               कृषि राज्यमंत्री श्री. खोत पुढे म्हणाले की, प्रशासनाने पंचनामे पूर्ण झाल्यानंतर गावनिहाय याद्यांचे वाचन प्रत्येक नुकसानग्रस्त गावांत शेतक-यांसमोर करावे.  याबाबत कोणत्याही शेतक-यांची तक्रार असेल तर तात्काळ दखल घ्यावी, असे त्यांनी सांगितले. पिक नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषि यंत्रणेकडून एकत्रितपणे करावेत व पंचनामे करतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना श्री. खोत यांनी केली.
              औसा तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करताना मोठ्या प्रमाणावर गहू, ज्वारी, द्राक्ष पिकांचे तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झालेले आहे. तरि भाजीपाला उत्पादक शेतक-यांचे ही पंचनामे करुन त्यांना कशा पध्दतीने मदत देता येईल याबाबत कार्यवाही करावी, असे  श्री. खोत यांनी सांगितले.
             यावेळी श्री. खोत यांनी खरीप हंगाम - 2015 चा 609 कोटी पिक विमा तर रब्बी हंगामाचा 109 कोटीचा पिक विमा लातूर जिल्ह्यातील शेतक-यांसाठी आलेला असून लवकरच प्रशासनामार्फत त्याचे वाटप होईल, असे सांगितले. तसेच सन 2016 च्या खरीप हंगामातील झालेल्या पिक नुकसानीचे अनुदान लवकर मिळण्याबाबत  कार्यवाही सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
              यावेळी विभागीय कृषि सहसंचालक श्री. जमदाडे यांनी लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद , कळंब, लोहारा व उमरगा या चार तालुक्यात तर लातूर जिल्ह्यातील लातूर व औसा तालुक्यात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती दिली.
               जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. कदम यांनी लातूर तालुक्यातील 3 हजार 306  हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान तर औसा तालुक्यातील 19 हजार 840 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती देऊन दोन-तीन दिवसात पूर्ण आकडेवारी येईल, असे त्यांनी सांगितले.
               तहसीलदार संजय वारकड यांनी लातूर तालुक्यातील ढाकणी या गावांमध्ये वीज अंगावर पडल्याने श्री. शुभम तानाजी सुरवसे यांचा मृत्यु झाला असून शासनाकडून त्यांच्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून 4 लाखाचा धनादेश देण्यात येणार असल्याचे सांगितले.



आत्माच्या समूह शेती पुस्तिकेचे विमोचन :- 
                यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते ‘आत्मा’ मार्फत जलजागृती सप्ताहनिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘समूह शेतीसाठी शेत गट निमिर्ती’  या घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले.

                                                                ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु