सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात
                                             - पालकमंत्री
 
         लातूर,दि. 12: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहीजेत. तसेच या रुग्णालयात एकदा रुग्ण आल्यानंतर आरोग्य सुविधे अभावी तो रुग्ण दुस-या खाजगी रुग्णालयात जाऊ नये याकरिता रुग्णालय प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन कौशल्य विकास, कामगार कल्याण, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
           शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील नेत्र विभागाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री श्री. निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाधिकारी पांडूरंग पोले, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, डॉ. अशोक शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती प्रतिभा पाटील- कव्हेकर, माजी खासदार गोपाळ पाटील, माजी आमदार गोविंद केंद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे यांच्यासह सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
           पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, आरोग्य विभागाने शासकीय रुग्णालयात दर्जेदार आरोग्य सुविधा गरजू व गोर गरीब रुग्णांना उपलब्ध कराव्यात. तसेच अशा गरजू व गोर गरिब रुग्णांप्रती वैद्यकीय अधिका-यांनी मानवी दृष्टीकोन ठेवावा, असे त्यांनी सांगितले.
          समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आरोग्य विभागाने याबाबत दक्ष राहून काम करावे. तसेच या रुग्णालयात स्वच्छता चांगल्या प्रकारे ठेवावी व येथे येणारा प्रत्येक रुग्ण हा येथील आरोग्य सिविधेबाबत समाधानी असला पाहीने व रुग्णांचे समाधान हीच खरी रुग्णसेवा असेल, असे श्री. निलंगेकर यांनी सांगितले.
             वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येक विभागात स्पेशालिटी येत असून नेत्र विभागांसाठी ही भव्य वास्तू व अद्यावत तंत्रणा निर्माण करण्यात आली असून जिल्ह्यातील गरजू रुग्णांना जास्तीत जास्त लाभ देण्याचे आवाहन श्री. निलंगेकर यांनी केले. तसेच रेल्वे विभागाकडील जागा रुग्णालयाला मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
              खासदार डॉ. गायकवाड यांनी महाविद्यालय व रुग्णालयाची रेल्वे विभागाकडील जागेबाबत रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असे सांगून या नेत्र विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त दृष्टी हिनांना दृष्टी मिळवून देण्याचे काम व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
              प्रारंभी पालकमंत्री श्री. निलंगेकर यांच्या हस्ते फीत कापून नेत्र विभागाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी श्री. निलंगेकर यांनी संपूर्ण इमारतीची व त्याअंतर्गत नेत्र विभागाच्या अद्यावत साधन साम्रगीची पाहणी केली.
             शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांनी प्रास्तावीक केले. यामध्ये  वैद्यकीय महाविद्यालयातील विविध पदवी व पदवीत्तोर अभ्यासक्रम तसेच रुग्णालयांमार्फत देण्यात येणा-या आरोग्य सुविधा बरोबरच नेत्र विभागाच्या इमारतीची ही माहीती त्यांनी दिली.  नेत्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. उदय मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले.
****



Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु