कमी खर्चात जास्त उत्पन्नाची हमी; लातूर जिल्ह्यात ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ अंमलबजावणी सुरु

लातूर, दि. ११ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) शेतकऱ्यांना हवामानातील बदलांशी जुळवून घेण्यास सक्षम करण्यासाठी लातूर जिल्ह्यात 'हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान' (सीआरटी) प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ‘नवीन तंत्रज्ञानाची किमया न्यारी, कमी खर्चात जास्त उत्पन्नाची हमी’ हे ब्रीद घेऊन राबवल्या जाणाऱ्या या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.

हवामानातील वाढती अनिश्चितता आणि 'एल निनो'चा संभाव्य धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न शाश्वत करणे, हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक यांनी पत्राद्वारे सर्व सरपंच महोदयांना या अभियानाचे नेतृत्व करण्याबाबत आवाहन केले आहे. ग्राम कृषी विकास समितीच्या माध्यमातून हे अभियान गावागावांत पोहोचवण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी रुंद व सरी वरंबे (बेड) तयार करणे, टोकन पद्धतीने लागवड, शून्य मशागत आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, तसेच पेरणीपूर्वी बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीज प्रक्रिया करण्यावर भर द्यावा. कीड नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क, निमास्त्र, अग्न्यास्त्र यांसारख्या घरगुती अर्कांचा वापर करण्यासह जीवामृत व बीजामृत तयार करून जमिनीचे आरोग्य सुधारावे, असे तंत्रज्ञान सुचवण्यात आले आहे. चिकट सापळे आणि एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करून खर्च कमी करत उत्पादन वाढवण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. या अभियानाच्या अधिक माहितीसाठी शेतकरी बांधवांनी आपल्या भागातील सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक किंवा कृषी ताई यांच्याशी संपर्क साधून खरीप हंगामात प्रत्यक्ष सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन