लातूर जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; २० मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. ११ : महाराष्ट्र
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यातील अनुसूचित
जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या सहा शासकीय निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष
२०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी गरजू विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे
सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये लातूर एमआयडीसी, लामजना (ता. औसा), तोंडारपाटी (ता. उदगीर) आणि
मरशिवणी (ता. अहमदपूर) येथे मुलांच्या शाळा, तर जाऊ (ता. निलंगा) आणि बावची (ता. रेणापूर) येथे
मुलींच्या निवासी शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गासाठी
मुख्यत्वे प्रवेश दिले जाणार असून, सातवी ते दहावीच्या वर्गांमधील रिक्त जागांवरही
प्रवर्गानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. प्रवेशासाठी शासनाचे
आरक्षणाचे नियम लागू असून, त्यात अनुसूचित जातीसाठी ८० टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के, विमुक्त भटक्या जमाती ३ टक्के, विशेष मागास प्रवर्ग २ टक्के
आणि दिव्यांग प्रवर्गासाठी ५ टक्के जागा राखीव आहेत.
प्रत्येक वर्गाची प्रवेश क्षमता ४०
विद्यार्थी इतकी असून, इच्छुकांनी २० मे २०२६ पर्यंत संबंधित शाळेत अर्ज सादर करणे आवश्यक आहे, त्यानंतर १ जून २०२६ रोजी
पहिली निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून शैक्षणिक
साहित्य, निवास, भोजन, गणवेश आणि ट्रॅक सूट
यांसारख्या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने, अधिक माहितीसाठी
विद्यार्थ्यांनी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाशी
संपर्क साधावा.
****
Comments
Post a Comment