मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी लातूर तालुक्यात विशेष मोहीम; मतदारांनी 'मॅपिंग' प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी लातूर तालुक्यात विशेष मोहीम; मतदारांनी 'मॅपिंग' प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन लातूर, दि. ०७ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आणि पारदर्शकता जपण्यासाठी लातूर तालुक्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. सन २००२ च्या मतदार यादीशी सध्याच्या मतदारांचे मॅपिंग (पडताळणी) करणे अनिवार्य असून, ज्या मतदारांचे मॅपिंग पूर्ण होणार नाही, त्यांना भविष्यात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसमोर सुनावणीला सामोरे जावे लागू शकते. ही प्रक्रिया टाळण्यासाठी मतदारांनी तातडीने आपली पडताळणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार ही मोहीम २४ एप्रिल २०२६ ते ९ मे २०२६ या कालावधीत राबवली जात आहे. या कामासाठी तालुक्यातील सर्व मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षकांना पूर्णवेळ नियुक्त करण्यात आले असून त्यांना इतर कामांतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. सर्व बीएलओ दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संबंधित मतदान केंद्रावर उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त इतर वेळेत ते घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेणार आहेत. पडताळणीसाठी मतदारांनी आपले मतदार ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. २००२ मधील मतदारसंघ, मतदार यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक या आधारे ही पडताळणी केली जाईल. ज्यांचे नाव २००२ च्या यादीत नाही परंतु नंतर नोंदवले गेले आहे, अशा मतदारांची पडताळणी त्यांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या नावाच्या आधारे केली जाईल. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांनंतर आता महाराष्ट्र राज्यात ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. मतदारांनी आपले ब्लर फोटो (अस्पष्ट फोटो) अद्ययावत करण्यासाठी आणि 'डीएसई' नोंदींच्या पडताळणीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे. मतदारांनी ही मॅपिंग प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून भविष्यातील तांत्रिक अडचणी टाळता येतील, असे आवाहन लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन