महाराजस्व अभियानांतर्गत ८ मे रोजी लातूरमध्ये समाधान शिबीर; एकाच छताखाली मिळणार विविध शासकीय सेवा
महाराजस्व अभियानांतर्गत ८ मे रोजी लातूरमध्ये समाधान शिबीर; एकाच छताखाली मिळणार विविध शासकीय सेवा
लातूर, दि. ०७ : महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत लातूर तालुक्यात लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासनासाठी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेतील नियोजित वेळापत्रकानुसार शुक्रवार, ८ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता लातूर येथील गिरवलकर मंगल कार्यालयात या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी लातूर महसूल मंडळातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे व तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.
लातूर तहसील कार्यालयाच्यावतीने आयोजित या शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये महसूल विभागामार्फत रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, वय, अधिवास आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर, शेतकरी दाखला, अल्पभूधारक दाखला. तसेच डिजिटल सातबारा (क्यूआर कोडयुक्त) उतारा वितरण, प्रलंबित फेरफार निकाली काढणे आणि एक खिडकी योजनेअंतर्गत तत्काळ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच नवीन आधार कार्ड काढणे आणि जुन्या आधार कार्डातील दुरुस्तीची सेवाही याठिकाणी उपलब्ध राहील.
पुरवठा व आरोग्य विभागामार्फत शिधापत्रिकेत नाव लावणे किंवा कमी करणे आणि आरोग्य योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, पत्ता बदलणे किंवा दुरुस्ती करणे, कृषी विभागाची पी.एम. किसान सन्मान योजना, सामाजिक अर्थसाहाय्य मंजुरी आदेश वाटप व डीबीटी माहिती, भूमी अभिलेख विभागामार्फत क प्रत वाटप व जमीन मोजणी अर्ज स्वीकारणे आदी सेवा याठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. प्रशासकीय कामात गती आणून नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवणे हा या समाधान शिबिराचा मुख्य उद्देश आहे. लातूर महसूल मंडळातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे व तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment