लातूर येथील रंगरूट प्रशिक्षण केंद्राच्या वतीने 'स्वच्छता ही सेवा', वृक्षारोपण आणि रक्तदान शिबीर उत्साहात

लातूर येथील रंगरूट प्रशिक्षण केंद्राच्या वतीने 'स्वच्छता ही सेवा', वृक्षारोपण आणि रक्तदान शिबीर उत्साहात लातूर, दि. ०३ (जिमाका): येथील रंगरूट प्रशिक्षण केंद्राच्या आणि विविध संस्थांच्या वतीने पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढीस लावण्यासाठी 'स्वच्छता ही सेवा - २०२६', 'एक पेड माँ के नाम' अंतर्गत वृक्षारोपण तसेच भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदविला. 'स्वच्छता ही सेवा - २०२६' अभियानाअंतर्गत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन परिसर व आजूबाजूच्या क्षेत्राची स्वच्छता केली. याप्रसंगी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत स्वच्छ व निरोगी वातावरण राखण्याबाबत जनजागृती करण्यात आली. रंगरूट प्रशिक्षण केंद्रात १ हजार रोपांची लागवड लातूर येथील रंगरूट प्रशिक्षण केंद्रात 'एक पेड माँ के नाम' या अभियानाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान सुमारे १ हजार विविध रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणासोबतच उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व सहभागी व्यक्तींनी परिसर स्वच्छ ठेवण्याची सामूहिक शपथ घेतली. ३० जणांचे उत्स्फूर्त रक्तदान विलासराव देशमुख महाविद्यालय व रुग्णालयाच्या श्रीमती काटगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास संस्थेचे कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांना मदत करण्याचा आणि समाजात रक्तदानाविषयी जनजागृती निर्माण करण्याचा मोलाचा संदेश दिला. या कार्यक्रमास लातूर येथील रंगरूट प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तथा उपमहानिरीक्षक अमीरूल हसन अंसारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, अधिकाधिक वृक्षारोपण आणि रक्तदानाचे महत्त्व विशद केले. तसेच उपस्थितांना अशा सामाजिक व पर्यावरणीय उपक्रमांमध्ये निरंतर सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी आणि ग्रामस्थांच्या सक्रीय सहभागामुळे हे सर्व उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडले. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत