मांजरा नदी जलसंवाद यात्रेचे लातूर जिल्ह्यात आगमन शाश्वत विकासासाठी नीर, नारी आणि नदीचा सन्मान आवश्यक - डॉ. राजेंद्रसिंह

 

मांजरा नदी जलसंवाद यात्रेचे लातूर जिल्ह्यात आगमन

शाश्वत विकासासाठी नीर, नारी आणि नदीचा सन्मान आवश्यक

-    डॉ. राजेंद्रसिंह

·        जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियानास सुरुवात

·        बीड जिल्ह्यातून आणलेला  जलकलश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

·        नदीसाक्षरतेसाठी आठ दिवस नदीकाठच्या गावांमध्ये जनजागर

·        नदीसोबतच नदीकाठच्या गावांच्याही समस्या जाणून घेणार


लातूर
, दि. 11 (जिमाका) : आपली प्राचीन परंपरा नीर, नारी आणि नदीचा सन्मान करणारी होती. आपल्या या परंपरा निसर्गाचे संवर्धन करणाऱ्या होत्या. आपल्याला पुन्हा नीर म्हणजे पाणी, नारी म्हणजे जननी आणि जीवन देणारी नदीचे संवर्धन करावे लागेल. यातूनच मानवी जीवनाचा विकास घडेल, असा विश्वास रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी आज व्यक्त केला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महासंस्कृती, राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, लातूर जिल्हाधिकारी कार्यालय, मानवलोक संस्था आणि मांजरा नदी जलसंवाद यात्रा समन्वय समितीच्यावतीने सारसा (जि. लातूर) येथे आयोजित ‘चला जाणूया नदीला’ अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. राजेंद्रसिंह बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. हे होते.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, मांजरा नदी जलसंवाद यात्रेचे मराठवाडा समन्वयक अनिकेत लोहिया, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय गिरी, तहसीलदार स्वप्नील पवार, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी पी. व्ही. कांबळे, सहायक वनसंरक्षक वृषाली तांबे, गट विकास अधिकारी तुकाराम भालके, कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधन सहायक शतद पुरोहित, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी, सारसा येथील सरपंच ज्योती हणमंत भिसे, उपसरपंच परमेश्वर  भिसे, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश मौने, मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जाधव,  यावेळी उपस्थित होते.


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘चला नदीला जाणूया’ या अभियान राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या माध्यमातून आपल्या जीवनवाहिन्या नद्यांना अमृतवाहिनी बनविण्याचे प्रयत्न  होणार असून त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने साजरा झाला असे म्हणता येईल. असे अभियान राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे सांगून या अभियानाबद्दल डॉ. राजेंद्रसिंह यांनी राज्य शासनाचे आभार मानले. राज्यात सध्या 109 जलसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

नदी ही आपली जीवनदायिनी असून तिचे स्वास्थ बिघडले, तर आपणही निरोगी राहू शकणार नाही. त्यामुळे प्रत्यकाने आपली जबाबदारी ओळखून नदीच्या संवर्धनासाठी, स्वच्छतेसाठी काम करावे. भूपृष्ठावरून वाहणाऱ्या नद्याच भूगर्भातील जलप्रवाह निर्माण करतात. त्यामुळे आपल्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत जपण्यासाठी नदीची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी ‘चला जाणूया नदीला’ अभियानात शासनासोबतच लोकांचाही तितकाच सहभाग आवश्यक आहे. शासन आणि जनता यांनी एकत्र येवून हे अभियान राबविल्यास दुषित होत असलेली नदी पुन्हा अमृतवाहिनी बनेल, असे डॉ. राजेंद्रसिंह यावेळी म्हणाले.


‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत जलसंवाद यात्रा मांजरा नदीच्या दोन्हीकाठावरील गावांमध्ये जाणार असून यामाध्यमातून नदीच्या प्रदूषणाची कारणे, या गावांमधील  लोकांच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. मानवनिर्मित कारणांमुळे होणारे नदी प्रदूषण कमी होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘चला जाणूया नदीला’ अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होवून या अभियानाला लोकचळवळ बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले.

नदी प्रदूषण रोखण्यासाठी नदी काठांवरील गावांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. गावातील घनकचरा, सांडपाणी नदीमध्ये टाकल्याने नदीचे पाणीही प्रदूषित होते. त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर, शेतीवर होत असतात. त्यामुळे गावातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असून यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून 30 टक्के निधी ठेवण्यात आला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.

जमिनीवरील वृक्ष, मातीत मिसळणारी सेंद्रिय द्रव्ये यावरच मातीची जलधारण अवलंबून असते. त्यामुळे नदी आणि जलस्त्रोतांचे संवर्धन होण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. यासाठी फळबाग लागवड आणि आर्थिक उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची शेतजमिनीवर लागवड करणे उपयुक्त ठरेल, असे मत कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधन सहायक शतद पुरोहित यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविकात श्री. लोहिया यांनी मांजरा नदी जलसंवाद यात्रेच्या आयोजनाची माहिती दिली. नदी ही आपली माता असून तिच्या आरोग्याची काळजी घेणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी प्रदूषणाची कारणे जाणून घेण्यासाठी ‘चला जाणूया नदीला’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी उपस्थितांना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जलप्रतिज्ञा दिली. शाहीर सुधाकर देशमुख आणि राजू आवळे यांनी नदीची अगोदरची स्थिती आणि सद्यस्थितीविषयी माहिती देणारी गीते सादर केली. यावेळी त्यांनी ‘एक तरी झाड लाव माणसा...’ अशी साद घातली. तसेच ‘सारे मिळूनिया चला, भेटू मांजरा नदीला...’ हे गीत सादर करून अभियानाची माहिती दिली. राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण करून नदी प्रदूषणामुळे मानवी जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली व नदी वाचविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मांजरा नदी जलसंवाद यात्रेचे लातूर जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. संजय गवई यांनी केले, तर सहसमन्वयक कॅप्टन प्रा. डॉ. बाळासाहेब गोडबोले यांनी आभार मानले. सारसा येथील ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह मांजरा नदी जलसंवाद यात्रा समन्वय समितीचे सदस्य, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मांजरा नदी जलसंवाद यात्रेचे जिल्हाधिकाऱ्यांनी केल स्वागत

‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत मांजरा नदीचे उगमस्थान असलेल्या बीड जिल्ह्यातील गोवळवाडी येथून सुरु झालेली मांजरा नदी जलसंवाद यात्रेचे आज लातूर जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी सारसा येथे मांजरा नदीवरील पुलावर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी जलसंवाद यात्रेचे स्वागत केले. यावेळी ‘चला जाणूया नदीला’ अभियानाचे मराठवाडा समन्वयक अनिकेत लोहिया यांनी बीड जिल्ह्यातून आणलेला जलकलश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे सुपूर्द केला.

सारसा येथे प्रभातफेरी, वृक्षरोपणद्वारे जलसंवाद यात्रेला प्रारंभ

मांजरा नदी जलसंवाद यात्रेचे सारसा येथे आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते जलकलशाचे पूजन करण्यात आले. तसेच जलकलशासह गावातून प्रभातफेरी काढून जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी जलसंवर्धन, नदीसंवर्धनाबाबत घोषवाक्यांचे फलक घेवून विद्यार्थी या प्रभातफेरीमध्ये सहभागी झाले होते. तसेच भजनी मंडळानेही टाळ-मृदंगाच्या गजरात जलसंवाद यात्रेचे स्वागत करून प्रभातफेरीत सहभाग घेतला. मांजरा नदीकाठावरील संत गणेशनाथ महाराज मंदिर परिसरात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते जलपूजन आणि वृक्षारोपणाने प्रभातफेरीची सांगता झाली.

******

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु