लातूर येथे सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन
लातूर येथे सामाजिक न्याय दिनानिमित्त 26 जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन
लातूर, दि. 24 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 26 जून 2025 रोजी लातूर येथे सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी आणि मागासवर्गीय, दिव्यांग, वृद्ध, निराधार व दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा आदर्श समाजापुढे यावा, यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
या निमित्ताने सकाळी 7:30 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक येथे समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांच्या उपस्थितीत शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून समता दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. यानंतर शालेय विद्यार्थ्यांची रॅली राजर्षी शाहू महाराज पुतळा, राजर्षी शाहू चौक – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक - गंजगोलाई – महात्मा गांधी चौक मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात येईल.
समता दिंडीद्वारे नागरिकांना कायद्यासमोर समानता, भेदभाव प्रतिबंध, अस्पृश्यता प्रतिबंध, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मूलभूत कर्तव्यांबाबत जनजागृती केली जाईल. तसेच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यावर आधारित व्याख्याने, पोवाडे, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त विलास केंद्रे यांनी दिली आहे.
*****
Comments
Post a Comment