लोकशाही रक्षणाच्या लढ्याला प्रदर्शनाच्या माध्यमातून उजाळा !







आणीबाणीच्या काळातील घटनांवर आधारित प्रदर्शनाचे लातूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन


लातूर, दि. २५ : देशात २५ जून १९७५ रोजी लागू झालेल्या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनाद्वारे आणीबाणीच्या काळातील आव्हानात्मक परिस्थितीत लोकशाहीच्या रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना उजाळा देण्यात आला आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील कक्षात आयोजित या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, अहिल्या गाठाळ, गणेश पवार, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, आणीबाणीच्या काळात बंदिवास भोगलेले माजी आमदार मनोहर पटवारी, प्रदीप पाटील खंडापूरकर, सुभाष निंबाळकर, अनिल अंदोरीकर, अशोक मठपती उपस्थित होते.


आणीबाणीचा कालखंड हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नव्या पिढीला त्या काळातील घटनांचा इतिहास आणि लोकशाहीच्या संरक्षणाचे महत्त्व समजण्यास मदत होईल, असे मत प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी व्यक्त केले.


लातूर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आणीबाणीच्या ५०व्या वर्षपूर्तीनिमित्त हे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात आणीबाणीच्या काळातील महत्त्वाच्या घटना आणि लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी केलेल्या संघर्षाचा इतिहास प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. आणीबाणीशी संबंधित विविध घटना, घडामोडी, त्या काळात लोकशाहीसाठी लढणाऱ्या मान्यवरांची छायाचित्रे, तसेच संक्षिप्त पण माहितीपूर्ण मजकूर आणि माहितीफलकांचा समावेश आहे.


या प्रदर्शनात आणीबाणीच्या कालावधीतील संपूर्ण संघर्षाचा संक्षिप्त परिचय आणि त्यातील महत्त्वाचे टप्पे यांची मांडणी करण्यात आली आहे. माहितीपूर्ण मजकूर आणि ऐतिहासिक छायाचित्रांमुळे नागरिकांना त्या काळातील आव्हानात्मक परिस्थिती आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती मिळेल. तसेच, आणीबाणीविषयी चित्रफितीचाही या प्रदर्शनात समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन