गाव विकासाचा किमान 25 वर्षाचा विकास आराखडा तयार करावा
कामगारमंत्री
संभाजी पाटील-निलंगेकर
लातूर, दि.06: प्रत्येक गावाचा सर्वांगीण
विकास होण्यासाठी त्या गावामध्येच रोजगार निर्मिती होणे आवश्यक आहे. त्याकरिता गावातील
तरुणांनी एकत्रीत येऊन गाव विकासाकरिता आवश्यक विविध योजनांचा पुढील 25 वर्षाचा विचार
करुन प्रारुप विकास आराखडा तयार करण्याचे आवाहन कामगार व कौशल्य विकास मंत्री श्री.
संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
निलंगा
तालुक्यातील अनसरवाडा येथील महावितरण कंपनीच्या 33 के.व्ही उपकेंद्राचे उद्घाटन व अनसरवाडा
जोड रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या भूमीपूजन कार्यक्रम प्रसंगी श्री.
निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उपविभागीय अधिकारी भवानजी
आगे, महावितरणचे मुख्य अभियंता अनिल भोसले, अधिक्षक अभियंता डी.डी. हमांद, सचिन तालेवार,
कार्यकारी अभियंता मंदार वागयानी तहसीलदार
विक्रम देशमुख, श्री नागनाथ निडवदे, अजित माने, यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी,ग्रामस्थ,
शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगारमंत्री
निलंगेकर पुढे म्हणाले की, गावाच्या विकासाकरिता प्रत्येकाचे सहकार्य आवश्यक असून ग्रामस्थांनी
ही आपल्या मानसिकतेत बदल करुन शासकीय योजनांत सक्रीय सहभाग द्यावा. तसेच कौशल्य विकासाच्या
माध्यमातून प्रत्येक गावात रोजगार निर्मिती व्हावी याकरिता गावातील तरुणांनी एकत्रित
यावे असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात मागील काही वर्षात निर्माण झालेली टंचाईची परिस्थिती
पाहता या भागातील लोकांनी पोपटराव पवार यांच्या हिवरेबाजार गावाचा आदर्श समोर ठेवून
पाणी संवर्धनाचे काम करण्याची सुचना श्री. निलंगेकर यांनी केली.
प्रत्येक गावांमध्ये वीज,रस्ता व पाणी
या पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. परंतु बदलत्या हवामान परिस्थितीमुळे
पावसाचे प्रमाण नगण्य झाले असल्याने शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान व इतर विकासात्मक
उपक्रमात लोकांनी सहभाग दिल्यास विकासाचा मार्ग अधिक गतीमान होईल, असे श्री. निलंगेकर
यांनी स्पष्ट केले.
संपुर्ण गाव व्यसनमुक्त असणे व शासकीय
उपक्रमात सक्रीय सहभाग देणे यामुळे गावच नाही तर त्या गावातील लोक ही आदर्श झाले पाहीजे
याकरिता सर्वांनी परस्परांत सहकार्य ठेवून काम करण्याचे आवाहन श्री. निलंगेकर यांनी
केले. तसेच अनसरवाडा गावाचा 33 के.व्ही. उपकेंद्रामुळे विजेचा प्रश्न सोडविला गेला
असून रस्त्याच्या भूमीपुजन झाल्याने चांगला रस्ताही लवकरच होईल. त्याप्रमाणेच गावातील
सभागृहासाठी 10 लाखाचा निधी मंजूर केला असून गावात जलयुक्तच्या माध्यमातून नदीवर पाच
बंधा-यांकरिता 1 कोटींचा निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनसरवाडा हे गाव सकारात्मक विचारपध्दतीचे
गाव असून या गावाचा समावेश सांसद आदर्श ग्राम
योजनेत झालेला आहे. तसेच यावर्षीच्या जलयुक्त अभियानात गावाची निवड झालेली असल्याने
जलसंधारणाचे कामे करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगीतले. तसेच
गावाचा सर्वांगीण विकास करुण समाजातील प्रत्येक घटकांना न्याय मिळवून देणे व शासकीय
योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबध्द असल्याचे श्री. पोले
यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक टी.टी. माने यांनी करुन गावाचे प्रश्न मांडून
ते सोडविण्याची मागणी केली.
प्रारंभी महावितरण वीज कंपनीच्या 33 के.व्ही.
उपकेंद्राचे उद्घाटन कामगार मंत्री निलंगेकर यांनी फीत कापून केले. यावेळी या परिसरात त्यांच्या हस्ते
वृक्षारोपण ही करण्यात आले. तसेच अनसरवाडा जोडरस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमीपूजन
श्री. निलंगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अनसरवाडा ग्रामस्थांनी श्री. निलंगेकर यांचा
सत्कार केला.
****
Comments
Post a Comment