प्रशासनाने सोयाबीन पिकाच्या नुकसानीबाबतचे पंचनामे त्वरित करावेत
                                                    महसूल राज्यमंत्री संजय राठोड

     लातूर, दि.03: जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी करतांना सोयाबीन पिकांवर खोड आळीचा प्रार्दुभाव झाल्याचे आढळून आलेले असून त्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले आहे. तरि प्रशासनाने सोयाबीनच्या नुकसानीबाबतचे पंचनामे त्वरित करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम अनुषंगाने आयोजीत आढावा बैठकीत दिले.
         यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, आमदार प्रकाश अबाटीकर, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ, अप्पर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर, अप्पर पोलीस अधिक्षक लता फड, उपजिल्हाधिकारी ए.बी. गव्हाणे, आदिसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
         महसूल राज्यमंत्री राठोड पुढे म्हणाले की, टंचाईवरील उपाय योजनेसाठी मागणी केलेला सर्व निधी लवकरच देण्यात येणार असून यापुर्वीचे पिक नुकसानीबाबतचे उर्वरीत सर्व अनुदान ही प्रशासनाकडे त्वरित देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
          जलयुक्त शिवार अभियानाची जिल्ह्यात चांगली कामे झालेली असून यावर्षी निवडलेल्या 176 गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे चांगल्या प्रकारे करण्याची सूचना श्री. राठोड यांनी केली. तसेच वन विभागाने जलयुक्त मधून माथा ते पायथा अशी कामे प्रस्तावीत करून त्या गावांना पाणी उपलब्ध करण्याचे त्यानी सांगीतले.
         सी.एस.आर. फंडातून गावनिहाय केलेल्या कामांची सविस्तर माहिती यंत्रणानिहाय सादर करण्याची सुचना श्री. राठोड यांनी करुन जिल्हा परिषदेच्या संबंधित यंत्रणांनी जलयुक्त मधील कामाला अधिक गती देण्याचे निर्देश दिले.
          जिल्ह्यात विज वितरण कंपणीने चांगल्या पायभूत सुविधा निर्माण करुन नागरिकांना व शेतक-यांना नियमीत विज पुरवठा करण्याबाबतची कार्यवाही त्वरीत करण्याचे निर्देश श्री. राठोड यांनी दिले. तसेच विज उपकेंद्रासाठी जागा आवश्यक असेल तर तात्काळ देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
            महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब योजना आदी योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थ सहाय्य मिळाले पाहीजे याबाबत दक्षता घेण्याची सुचना श्री. राठोड यांनी केली. तसेच राष्ट्रीय कुटुंब योजनेअंतर्गत त्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या कुटुंबाला प्रशासनाची त्वरीत मदत मिळण्यासाठी संबंधीत गावातील तलाठी, ग्रामसेवक तसेच तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी काळजी घेतली पाहीजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
            यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी शेतक-यांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्या मांडून त्याबाबत प्रशासनाने वेळेत कार्यवाही करण्याची सूचना केली. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थांना सिंचन विहिर देण्याविषयी त्यांनी सांगीतले. यावेळी आमदार अजय चौधरी व प्रकाश अबाटीकर यांनी ही मार्गदर्शक सुचना दिल्या.
            प्रारंभी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी लातूर जिल्हाची माहिती देऊन प्रशासनाने टंचाई, जलयुक्त , विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी ची संक्षिप्त माहिती पॉवर पॉईंट प्रझेन्टेशन द्वारे दिली. यामध्ये जिल्ह्यात आजपर्यंत 68 टक्के पर्जन्यमान झालेले असून जिल्ह्यातील पाणी उपलब्धतेची माहिती दिली. तसेच उपलब्ध असलेले पाणी सुरक्षित ठेवून जास्तीत जास्त दिवस पुरेल याबाबतचे नियोजन केल्याचे श्री . पोले यांनी सांगितले.
            यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती,पर्जन्यमान,पाणीसाठा,पीक कर्ज वाटप, पीक कर्जाचे पुर्नगठन, मनरेगा योजनेतील कामे, जलयुक्त शिवार अभियान , वैयक्तीक लाभाच्या विविध योजना, कृषि, विज वितरण ,जलसंधारण,लातूर शहर पाणी पुरवठा योजना, टंचाई वरील विविध उपाय योजना, शेतक-यांना अनुदान वाटप आदि विविध बाबींचा  सविस्तर आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु