मराठवाड्याच्या
सर्वांगीण विकासाकरिता सर्वांच्या सहकार्याची गरज
लातूर,दि.17:
मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाच्या हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी
आपल्या संपुर्ण आयुष्याची आहुती देऊन मराठवाड्यातील
सर्व जिल्हे निजामांच्या जोखडातून मुक्त केले. त्याची जाणीव ठेऊन मराठवाड्याच्या सामाजिक,आर्थिक,
शैक्षणिक, सांस्कृतीक व कृषिविषयक सर्वांगीण विकासाकरिता सर्वांचे सहकार्य गरजेचे असल्याचे
प्रतिपादन कामगार व कौशल्य विकास मंत्री श्री. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या 68 व्या
वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथील हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे आयोजित मुख्य
शासकीय ध्वाजारोहण प्रसंगी श्री. निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा
श्रीमती प्रतिभा पाटील कव्हेकर, खासदार सुनील गायकवाड, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले,
मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ, पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड, महापौर दिपक सूळ,
उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरसिंग
भंडे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक,पदाधिकारी,
विद्यार्थी, विविध विभागाचे प्रमुख, पत्रकार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
श्री. निलंगेकर पुढे म्हणाले की, भारताला
15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळून देशातील 565 पैकी 562 सस्थाने स्वतंत्र्य भारतात
विलीन झाली होती. परंतु हैद्राबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने मात्र स्वतंत्र्य
भारतात सामील झाली नव्हती. मराठवाड्यातील जिल्हे निजाम संस्थानाच्या राजवटीखाली पारतंत्र्यात
होते. निजामांच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी संपुर्ण
हैद्राबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरु झाला होता.
तसेच मराठवाड्याच्या गावागावातून हा मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढा अनेक
स्वातंत्र्य सैनिकांनी तेजस्वीपणे लढला. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे हे आंदोलन सतत
13 महिने सुरु होते. या आंदोलनात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती
दिली. निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत, हे पाहून भारत सरकारने
पोलीस ॲक्शन सुरु केली. अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या हुकुमशाहीतून मराठवाडा
मुक्त झाला. हा केवळ संस्थानांच्या विलीनीकरणाचा लढा नव्हता तर भारताच्या प्रादेशिक
आखंडतेचा लढा होता. त्यामुळे लढ्याचे मोल फार मोठे आहे, असे श्री. निलंगेकर यांनी याप्रसंगी
सांगितले.
प्रारंभी पोलीस पथकाकडून हुतात्मा स्मारक स्मृती
स्तंभ येथे हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर कामगारमंत्री श्री. निलंगेकर,
खासदार सुनिल गायकवाड, जिल्हाधिकारी श्री. पोले, पोलीस अधिक्षक राठोड, जिल्हा परिषद
अध्यक्षा श्रीमती प्रतिभा पाटील कव्हेकर यांच्या हस्ते स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर पोलीस शस्त्र दलाने हवेत
तीनवेळा गोळीबार करून हुतात्म्यांना शस्त्र सलामी दिली.
यावेळी श्री. निलंगेकर यांच्या हस्ते मराठवाडा
मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी येथे उपस्थित
असलेले स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि
बंधु-भगिनींची सदिच्छा भेट घेवून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा श्री. निलंगेकर
यांनी दिल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामानुज रांदड व उध्दव फड यांनी केले.
*****
Comments
Post a Comment