संवादपर्व अभियानाच्या माध्यमातून खोपेगावच्या ग्रामस्थांचे
शासकीय योजनांबाबत प्रबोधन
         लातूर,दि.13: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय लातूर व खोपेगाव येथील संजिवणी सार्वजनिक गणेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामस्थांना संवादपर्व अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती देऊन प्रबोधन करण्यात आले.
         खोपेगाव ता. लातूर येथे आयोजित संवादपर्व अभियानात उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी आर.आर शेख, तालुका कृषि अधिकारी बी. व्ही. वीर, लातूर तहसिलचे नायब तहसिलदार बी. एल. रुकनर, कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेचे पुष्पराज खुबा, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, सरपंच श्रीपती जांबळदारे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अनिरुध्द मोरे, खोपेगाव संजिवणी सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर सादले, अमोल घायाळ यांच्यासह युवक, युवती, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        उपविभागीय कृषि अधिकारी श्री. मोरे यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यात जमीनीची आरोग्य पत्रिका अत्यंत महत्वाची  असून त्यानुसार त्या जमिनीत कोणते पीक घेणे योग्य ठरेल हे कळतं, तसेच त्याकरिता आवश्यक उपाय योजना करणे सोईचे जाते असे त्यांनी सांगितले सर्व शेतक-यांना शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात सहभाग घेण्याचे श्री. मोरे यांनी आवाहन केले. तसेच पंतप्रधान पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, सद्यस्थितीमध्ये सेंद्रिय शेतीची गरज व महत्व, चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान आदि योजनांची सविस्तर माहिती देऊन ग्रामस्थांचे प्रबोधन केले.
         राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार कुशल बनविण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत असून याअंतर्गत विविध अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण बेरोजगारांना देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेचे पुष्पराज खुबा यांनी दिली. तरि खोपेगावसह लातूर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी प्रशिक्षण घेऊन रोजगार कुशल बनण्याचे आवाहन त्यांनी केले.
         मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास कार्यक्रम सुरु झाला असून महाराष्ट्र राज्य यात आघाडीवर असल्याचे श्री. खुबा यांनी सांगीतले. देशाच्या ग्रामिण व शहरी भागातील एक ही बेरोजगार  तरुण रोजगारापासून वंचित राहणार नाही याकरिता शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
           ग्रामिण भागात आरोग्य  विषयक बहुतांश तक्रारी असून या तक्रारी ग्रामस्थांमध्ये आरोग्यबाबत जनजागृती नसल्यानेच आहेत. याकरिता ग्रामस्थांनी आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवून डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे मलेरिया, डेंग्यु यासारख्या आजारावर नियंत्रण निर्माण करता येते, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर. आर. शेख यांनी दिली. तसेच ग्रामस्थांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेत सक्रीय सहभाग घेऊन मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
          नायब तहसिलदार श्री. रुकनर यांनी संजय गांधी निराधार अर्थ सहाय्य योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब योजना, आदि योजनांची माहिती देऊन ग्रामस्थांचे प्रबोधन केले. जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी संवादपर्व अभियानाचा उद्देश सांगितला. महाराष्ट्राचा सांस्कृतिक सोहळा असलेल्या गणेश उत्सवात सामाजिक जाणीव जागृती प्रभावीरित्या करणे शक्य असून यातून गणेश मंडळांमध्ये शासनाच्या लोककल्याणाच्या योजना, धोरणे आणि निर्णयाची माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात श्री. गणेश आरती व स्वागत गीताने करण्यात आली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ओंकार वंजारे यांनी केले. तर आभार अमोल घायाळ यांनी मानले.




****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु