खरीप हंगाम २०२६-२७ करिता बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिकांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

लातूर, दि. १२ : सन २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया), राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान, तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिकांसाठी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

 गळीतधान्य, अन्नधान्य, तृणधान्य, भरडधान्य आणि कडधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढवणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना सुधारित वाणांचे दर्जेदार बियाणे वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर ही पावले उचलली जात आहेत. खरीप हंगामातील तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी आणि सोयाबीन यांसारख्या प्रमुख पिकांसाठी १० वर्षांखालील आणि १० वर्षांवरील वाणांचे बियाणे वितरित केले जाणार आहे. यासोबतच पीक प्रात्यक्षिकांसाठी देखील शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

 कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे संच (मिनीकीट) वितरणाची प्रक्रिया 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर राबविली जाणार आहे. यासाठी १० एप्रिल २०२६ पासून महाडीबीटी पोर्टलवर अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तातडीने आपले ऑनलाइन अर्ज सादर करावेत, जेणेकरून त्यांना या योजनांचा वेळेत लाभ घेता येईल. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाडीबीटी पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन