डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा आता घरबसल्या उपलब्ध; नागरिकांनी एजंटांपासून सावध राहण्याचे लातूर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

लातूर, दि. १२ : जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या जमिनीचे महसुली अभिलेख सुलभ, पारदर्शक आणि अत्यंत जलद गतीने उपलब्ध व्हावेत, यासाठी महसूल विभागातर्फे ‘डिजिटल सातबारा’ ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अलीकडच्या काळात सातबारा उतारा मिळवण्यासाठी काही मध्यस्थ किंवा एजंट नागरिकांकडून अवाजवी पैसे उकळत असल्याच्या तक्रारी आणि बातम्या समोर येत आहेत. मात्र, नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा प्राप्त करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि माफक दरात उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही एजंटांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

 भूमी अभिलेख विभागाच्या https://bhulekh.mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांना स्वतःच्या जमिनीची माहिती पाहायची अथवा नोंदी तपासण्याची सुविधा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. या पोर्टलवर नागरिक आपला जिल्हा, तालुका आणि गाव निवडून सातबारा, आठ-अ आणि मालमत्ता पत्रक कोणत्याही शुल्काशिवाय पाहू शकतात, मात्र ही प्रत केवळ माहितीसाठी असून ती कायदेशीर कामासाठी वापरता येत नाही.

 कायदेशीर कामासाठी आवश्यक असलेला डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा मिळवण्यासाठी नागरिकांनी महसूल विभागाच्या https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या संकेतस्थळाचा वापर करावा. या सुविधेसाठी शासनाने केवळ १५ रुपये इतके माफक शुल्क निश्चित केले आहे आणि विशेष म्हणजे उताऱ्याची पाने कितीही असली तरी हे शुल्क कायम राहते. या डिजिटल उताऱ्यास कोणत्याही सरकारी कार्यालयात, बँकेत किंवा न्यायालयीन कामकाजासाठी स्वतंत्र शिक्का किंवा तलाठ्यांच्या स्वाक्षरीची गरज लागत नाही, ज्यामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रमाची मोठी बचत होत आहे.

 डिजिटल उतारा प्राप्त करण्यासाठी नागरिकांनी प्रथम पोर्टलवर जाऊन ‘न्यूज युझर रजिस्ट्रेशन’ (New User Registration) द्वारे स्वतःची नोंदणी करून लॉगिन आयडी तयार करावा. त्यानंतर लॉगिन करून आपल्या जमिनीचा गट क्रमांक किंवा सर्व्हे नंबर प्रविष्ट करावा आणि यूपीआय (UPI), नेट बँकिंग किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून १५ रुपयांचा भरणा करावा. व्यवहार यशस्वी झाल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीयुक्त उतारा पीडीएफ (PDF) स्वरूपात डाउनलोड करता येईल.

 लातूर जिल्हा प्रशासनाने सर्व तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना नागरिकांना या प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर कोणत्याही व्यक्तीकडून या कामासाठी जादा पैसे मागितले जात असतील किंवा नागरिकांची फसवणूक होत असेल, तर त्यांनी तात्काळ लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ०२३८२-२२०२०० या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन