तेरू मध्यम प्रकल्प परिसरात मत्स्यव्यवसायिकांना विविध शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन

तेरू मध्यम प्रकल्प परिसरात मत्स्यव्यवसायिकांना विविध शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन लातूर, दि. ०५ (जिमाका): मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना सुलभतेने मिळावा, या उद्देशाने उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील तेरू मध्यम प्रकल्प परिसरात मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या सभासदांसाठी नुकतेच जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास सुमारे शंभर सभासद उपस्थित होते. या शिबिरात उपस्थित सभासदांना मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना, राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म, किसान क्रेडिट कार्ड, ई-श्रम कार्ड आणि गट अपघात विमा योजना याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच योजनांच्या लाभासाठी आवश्यक असलेली नोंदणी, कागदपत्रांची पूर्तता आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या महा आयडी निर्मितीबाबत सभासदांना माहिती देऊन, उपस्थित सभासदांची 'महासारथी' प्रणालीवर महा आयडी निर्मिती करण्यात आली. यासोबतच 'महाडीबीटी २.०' पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणे, आवश्यक माहिती नोंदविणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि अर्ज सादर करण्याची प्रक्रिया यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म नोंदणीचे महत्त्व स्पष्ट करून, नोंदणी पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र प्राप्त करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक असलेल्या एनएफडीपी नोंदणी प्रमाणपत्राची पूर्तता करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. मत्स्यव्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध होण्याच्या दृष्टीने किसान क्रेडिट कार्ड योजनेची माहिती देण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध होण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि विहित मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास मिळू शकणाऱ्या व्याज सवलतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, ई-श्रम कार्ड नोंदणीचे महत्त्व आणि गट अपघात विमा योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या विमा संरक्षणाची माहितीही सभासदांना देण्यात आली. या शिबिराच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या सभासदांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या नोंदणी व कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ज्या सभासदांची एनएफडीपी नोंदणी, ई-श्रम कार्ड किंवा इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अद्याप झालेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले. मत्स्यव्यवसाय विभागाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून जनजागृती व नोंदणी प्रक्रियेला चालना दिली जात आहे. लातूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायिकांनी व मत्स्यव्यवसाय करण्यास इच्छुक नागरिकांनी योजनांच्या लाभासाठी 'महाडीबीटी २.०' पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, लातूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), लातूर यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, लातूर - ४१३५१२. दूरध्वनी क्रमांक: ०२३८२-२९९३२६, ई-मेल: acf_ltr@yahoo.com / laturacf@gmail.com या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत