प्रशासनामार्फत जलदुतच्या 111 व्या फेरीचे पुजन करून निरोप
लातूरला जलदुत @111 फेरीतून 25 कोटी 95 लाख लिटरचा पाणी पुरवठा

        लातूर,दि.9: शासनाने लातूर शहरातील भीषण पाणी टंचाईची परिस्थिती पाहुन मिरज येथून रेल्वेने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे दिनांक 12 एप्रिल 2016 रोजी पाण्याची पहिली रेल्वे लातूर येथे आली व आज पावेतो जलदुत रेल्वेने 111 फे-यातून एकूण 5 हजार 290 वॅगन मधून लातूर शहराला 25 कोटी 95 लाख लिटरचा पाणी पुरवठा केलेला आहे.
            दिनांक 9 ऑगस्ट 2016 रोजीच्या 111 व्या जलदुतच्या फेरीचं प्रशासनामार्फत पूजन करुन व हिरवी झेंडी दाखवून जलदुतला निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग, महापौर ॲड. दिपक सुळ, उपमहापौर श्री. लाहोटी, स्थायी समिती सभापती विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर स्मिता खानापूरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता श्री सुशिर, रेल्वे वाणिज्य विभागाचे निरीक्षक रमेश काळे आदि मान्यवर उपस्थित होते.
            या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना जिल्हाधिकारी पांडुरंग पोले म्हणाले की, रेल्वे, जिल्हा व माहापालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचा-यांनी परस्परांत उत्तम समन्वय ठेवून चांगले कामे केले. त्यामुळे लातूर शहरातील नागरिकांना टंचाईच्या काळात वेळेवर पाणी पुरवठा करण्यात आला.
            लातूर रेल्वे स्थानकातील मुख्य वाणिज्य निरीक्षक रमेश काळे म्हणाले की, कोणत्याही प्रकारच्या आपत्तकालीन परिस्थितीमध्ये रेल्वे विभाग आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत असतो. त्याच पध्दतीने जलदूत रेल्वेचे नियोजन करुन 12 एप्रिल ते 9 ऑगस्ट 2016 या कालावधीत 25 कोटी 95 लाख लिटर पाणी पुरवठा लातूर शहराला करण्यात आलेला आहे. लातूर शहराला टंचाईच्या काळात मिरजकर-सांगलीकर नागरिकांनी जलदुत च्या माध्यमातून पाणी पुरवठा करुन माणुसकीचा धर्म जोपासण्याचे काम केले आहे असे महापौर दिपक सुळ यांनी सांगीतले. रेल्वे विभाग, जिल्हा प्रशासन व मिरजकर नागरिकांचे लातूर शहरवासी ऋणी असल्याचे सांगीतले. यावेळी महापालिका स्थायी  समिती सभापती विक्रांत गोजमगुंडे रेल्वेचे अभियंता अशोक औसेकर यांनी ही मनोगत व्यक्त केले.
महापालिका आयुक्त तेलंग प्रास्ताविकात म्हणाले की, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रशासनाने परस्परांत योग्य समन्वये देऊन पाणी वितरणाची चांगली व्यवस्था करुन नागरिकांना समप्रमाणात पाण्याचे टॅंकरद्वारे वाटप करण्यात आले. यामध्ये मागील चार महिन्यापासून नियमीतपणे रेल्वेद्वारे पाणी आणण्याच्या कामात रेल्वे विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी ही बहुमोल सहकार्य दिलेले आहे असे त्यांनी सांगीतले.
            सद्यस्थितीमध्ये साई व नागझरी बंधा-यात पाणी आल्यामुळे महापालिकेमार्फत दर 15 दिवसांनी शहरातील नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केलेले आहे. तरी शहरातील नागरिकांनी मिळणा-या पाण्याचा अपव्यय न करता अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे आवाहन श्री. तेलंग यानी केले.
विशेष सत्कार :-
लातूर शहरांची टंचाईची परिस्थिती पाहून मिरजहून लातूर रेल्वे स्थानकात पोहोचलेले पाणी रेल्वे स्थानक लगत 18 लाख लिटर पाणी साठवण क्षमता असलेल्या एस.आर.देशमुख यांच्या विहिरीत साठवून तेथून टॅंकर द्वारे नागरिकांना वितरीत केले जात होते. याबद्दल एस.आर.देशमुख यांच्या प्रशासनाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच प्रगती कन्सट्रक्शने रेल्वे स्थानकात पाण्याची पहिली रेल्वे येण्यापुर्वी दोनच दिवसात वॉटर पॉईंट तयार करुन दिल्याबद्दल गोविंदराव माकणे यांचाही सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
रेल्वे अधिकारी-कर्मचारी सत्कार :-

        लातूर शहरात भीषण टंचाईच्या काळात दिनांक 12 एप्रिल ते 9 ऑगस्ट 2016 या कालावधीत काही अपवाद वगळता सातत्याने पाणी पुरवठा करणा-या रेल्वेतील अधिकारी व कर्मचा-यांप्रती कृतज्ञता म्हणून महापालीकेने रेल्वेच्या अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते केला.
            यामध्ये आजच्या 111 व्या रेल्वेफेरीचे लोको पायलट (चालक) अशोक कुमार, सहाय्यक पायलट एस.बी.सोधे, गार्ड शेख एहसान, सेंटर श्री. नाईक, सहाय्यक निरीक्षक जावेद शेख, माल पर्यवेक्षक आर.एम. ओव्हळ, मुख्य वाणिज्य निरीक्षक, रमेश काळे, रेल्वे क्षेत्रीय सलागार समिती सदस्य निजाम शेख, मेकॅनिक इंजिनिअर अशोक औसेकर कर्मचारी गोपाळ पाटील, अमोल कांबळे, आदिंचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.





पत्रकारांच्या वतीने सत्कार :-
            पत्रकार संघाच्या सुकाणू समितीमार्फत जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, आयुक्त सुधाकर तेलंग व वीज वितरणचे अभियंता श्री. देशमुख यांनी रेल्वेने पाणी पुरवठा करण्याच्या कामात बजाविलेल्या भुमिकेबद्दल सत्कार करण्यात आला.
जलदुतला निरोप :-
        दिनांक 12 एप्रिल 2016 रोजी मिरजहून 5 लाख लिटर पाणी घेवून जलदुत रेल्वे लातूर रेल्वे स्थानात आली. व त्यानंतर आजपावेतो पर्यंत 111 रेल्वेच्या फे-या पुर्ण झाल्या असून आज जलदुतने 50 वॅगन द्वारे 25 लाख लिटर पाणी आणले होते. तर एकूण 25 कोटी 95 लाख लिटर पाणी पुरवठा लातूर शहराला रेल्वेद्वारे करण्यात आलेला आहे. आजच्या जलदुतच्या 111 व्या फेरीनंतर जलदुतच्या परतीच्या प्रवासाला जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, महापौर दिपक सूळ, आयुक्त सुधाकर तेलंग यांनी हिरवी झेंडी दाखवून निरोप दिला. यावेळी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, महापालिका पदाधिकारी, रेल्वे अधिकारी कर्मचारी व लातूर शहरातील नागरीक उपस्थित होते.

                                                                              *****





Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा