नागरिकांनी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलपुर्नभरण अभियानात सहभागी व्हावे
                                                                                -कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर

      लातूर दि.15:- जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती पुन्हा उदभवू नये म्हणून प्रशासनामार्फत जलपुर्नभरण अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून आज पर्यंत 3 हजार नागरिकांनी या अभियानाच्या माध्यमातून  इमारतीच्या छतावर रुफ वॉटर हार्वेस्टींग करुन विंधन विहरींचे जलपुर्नभरन केलेले आहे. परंतु या अभियानात जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सक्रीय सहभागी होवून टंचाईच्या परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करावी, असे आवाहन कामगार, कौशल्य विकास, भुकंप पुर्नवसन व माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
        भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात आयोजीत मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी कामगार मंत्री श्री. निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती प्रतिभा पाटील- कव्हेकर, खासदार सुनील गायकवाड, माजी खासदार रुपाताई पाटील, महापौर दिपक सूळ, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, अप्पर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर, जलतज्ञ राजेंद्र सिंह, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरीक, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, पालक, पत्रकार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
        श्री निलंगेकर पुढे म्हणाले की, सर्वासाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र -2019 अंतर्गत लातूर जिल्हयात जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. या अंतर्गतच्या पहिल्या टप्प्यात जिल्हयातील 202 गावांची निवड होऊन विविध यंत्रणांमार्फत 4 हजार 479 कामे पुर्ण झालेली असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच जलयुक्तच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हयातील 176 गावांची निवड झालेली असून गावनिहाय  पाण्याचा ताळेबंद करुन आराखडयाचे कामे पुर्ण झालेली आहेत. या 176 गावांमधील जलसंधारणाच्या कामांकरिता 325 कोटीचा आराखडा  करण्यात आला असून यात मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातील कामांचा समावेश करण्यात आलेला आहे, असे त्यांनी सांगितले.
         लातूर जिल्हयाने लोकसहभागातून गाळ काढणे मोहिमेत एक नवीन पॅटर्न निर्माण केलेला असून याअंतर्गत 67 लक्ष  घन मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. तसेच शासकीय यंत्रणा, लोकसहभाग व लोकप्रतिनिधी निधी मधुन नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे 214 किमी इतके कामे  झाली असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही खोलीकणाची कामे सुरु असल्याचे श्री. निलंगेकर यांनी म्हटले.
     टंचाईच्या परिस्थितीमध्ये प्रशासनाने  359 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करुन 1 हजार 348 विहीरींचे अधिग्रहण तसेच 167 नवीन विंधन विहिर यासह टंचाईवरील विविध उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन नागरिकांना दिलासा दिला. त्याप्रमाणेच सन 2015-16 च्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबाबत 336 कोटी रुपयांचे  व पीक विमा योजनेचे 604 कोटी रुपयांचे अनुदान  शेतक-यांच्या बॅंक खात्यावर जमा केलेले आहेत, असे श्री निलंगेकर यांनी सांगितले.
         कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी स्व. प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत 68 प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून विविध 31 प्रकारच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत. यात 49 विविध प्रशिक्षणाच्या वर्गातून 1 हजार 449 तरुणांनी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण पुर्ण केलेले आहे. तर 101 वर्गाचे प्रशिक्षण चालू असून या वर्गातून 2 हजार 894 बेरोजगार तरुण प्रशिक्षण घेत आहेत. तरी जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांनी कौशल्यावर आधारित विविध अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेऊन कुशल व्हावे, असे आवाहन श्री. निलंगेकर यांनी केले.
        सर्वसामान्य नागरिक, दुर्बल घटकांतील नागरिक व पांढरी शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबासाठी  राजीव गांधी जीवनदायी  आरोग्य योजना  ही एक नवसंजीवन देणारी  योजना ठरली आहे.  जिल्हयातील  सर्व गरजू रुग्णांनी व शेतकरी बांधवांनी शासनाच्या या महत्वकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा. तसेच  माझी कन्या भाग्यश्री योजने अंतर्गत नागरिकांनी मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देण्याचे आवाहन श्री. निलंगेकर यांनी यावेळी केले.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी वैयक्तीक शौचालये बांधून माझा महाराष्ट्र  स्वच्छ महाराष्ट्र या अभियानास बळ देऊन संपुर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करावा असे श्री निलंगेकर यांनी सांगितले. तसेच सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण 2011 च्या याद्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये डकवण्यात आलेल्या असून ग्रामस्थांनी सदरील याद्याबाबत आपल्या हरकती वेळेत सादर कराव्यात. कारण याच याद्या अंतिम झाल्यानंतर त्यात समाविष्ठ असलेल्या लाभार्थ्यांनाच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे असे त्यांनी सांगीतले.
प्रारंभी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर श्री. निलंगेकर यांनी  परेड कमांडर पोलीस उप अधीक्षक विकास नाईक यांच्या समवेत पोलीस दल, गृहरक्षक दल, स्काऊट गाईड दल संचलनाची पाहणी केली.
यावेळी महात्मागांधी तंटामुक्त अभियान, आपत्ती व्यवस्थापन बाबत जागृती, बेटी बचाओ बेटी पढाओ, जलयुक्त शिवार अभियान, पाणी वाचवा धोरण, व्यवसाय निहाय नवीन उपकरणे, स्वच्छ भारत अभियान, रोहयो अंतर्गत कामाची माहिती, आदि चित्ररथ या संचलनात सहभागी झालेले होते. तसेच सरस्वती विद्यालय व गोदावरी लाहोटी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले तर सदानंद माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम व झांझच्या कवायती सादर केल्या.
पुरस्कार वितरण :- प्रसिध्द जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या तरुण भारत संघाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जलसंधारणाचे उल्लेखनीय कार्य केल्या बाबत जिल्हाधिकारी पांडुरंग पोले व मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांना श्री. निलंगेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.         
तसेच माझी कन्या भाग्यश्री योजने अंतर्गत मुलीच्या जन्मास प्रोत्साहन दिल्याबाबत जिल्हातील पाच दांपत्यांचा प्रसस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून कामगार मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. निलंगेकर यांनी समारंभास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक,ज्येष्ठ्य नागरिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-पालक आदि मान्यवरांची सदिच्छा भेट घेवून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छ दिल्या.
            यावेळी कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, पत्रकार,अधिकारी व कर्मचारी, नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या समारंभाचे सुत्रसंचालन रामानुज रांदड यांनी केले.

****






Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु