महिलांनी वेळीच जागी होऊन मुलांच्या
नवीन संकल्पनांना वाव द्यावा : पांडूरंग पोले

लातूर, दि.4 : समाजात दिवसेंदिवस पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या कमी होत आहे. पुरुष व महिलांतील ही तफावत मोठी समस्या निर्माण करणारी आहे. यासाठी महिलांनी वेळीच जागे होऊन मुलांचा आग्रह धरणाऱ्या जुन्या संकल्पना मोडीत काढव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले. महसूल विभागाच्या वतीने महाराजस्व अभियानांतर्गत आज दिनांक 04 ऑगस्ट 2016 रोजी  मुरुड (ता. लातूर) येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित महिला सक्षमीकरण मेळाव्यात श्री. पोले बोलत होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. प्रताप काळे, तहसीलदार संजय वारकड, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष हणुमंत नागटिळक, मुरुडच्या रुरल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष किशनराव नाडे, पंचायत समितीचे माजी सभापती यशवंतराव नाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेश उनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) चंद्रशेखर केकान व गटविकास अधिकारी डी. एच. दाईंगडे यांची  प्रमुख उपस्थिती होती.
श्री. पोले म्हणाले, ‘‘ विविध क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे येत आहेत. यामुळे महिलांबाबत पुर्वीची चूल अन् मुल ही भावना मागे पडली आहे. महिला पुरुषांपेक्षाही सक्षमपणे काम करु शकतात. महिला असतील तरच समाज टिकणार आहे. यामुळे आता महिलांनीच महिलांच्या रक्षणासाठी पुढे येऊन गर्भलिंग तपासणी व स्त्रीभ्रूणहत्येसारख्या अनिष्ट प्रथा रोखल्या पाहिजेत.’’ या वेळी पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण कक्षाच्या सहायक पोलिस निरीक्षक वर्षा दंडिमे यांनी युवतींनी तात्पुरत्या स्तुतीला हुरळून न जाता नकार देण्याची ताकद ठेवण्याचे आवाहन केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. एच. निपाणीकर यांनी महिलांच्या विविध योजनांची माहिती दिली. सहायक निबंधक (सहकारी संस्था) स्मृती पाटील यांनी महिलांनी स्वतःला सावधान ठेऊन सक्षम करण्याचा सल्ला दिला. बालविकास प्रकल्प अधिकारी व्ही. जी. यादव, मुरुडचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके व निवळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका फुंदे यांनीही मार्गदर्शन केले.
महसूल विभागाच्या वतीने २००४ मध्ये संगणकीकृत सातबारा देण्यास सुरुवात झाली. या उपक्रमात राज्यातील पहिला संगणकीकृत सातबारा येथील महिला खातेदार रूक्मीणबाई नामदेव खराडे यांना दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला होता. बारा वर्षानंतर गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात श्रीमती खराडे यांना पुन्हा जिल्हाधिकारी पोले यांच्या हस्ते संगणकीकृत सातबाराचे वाटप झाले. महसूल मंडळातील अन्य महिला खातेदारांनाही सातबाराचे वाटप करण्यात आले.





उपविभागीय अधिकारी डॉ. काळे यांनी प्रास्ताविकातून मेळाव्यामागील आयोजनाचा हेतू सांगितला. या वेळी जिल्हा परिषद सदस्या जयश्री तवले, सरपंच जयश्री पांगळ, नारायण सापसोड, वर्षा सुराणा, लता भोसले, डॉ. मंजुलता बाहेती, तलाठी ज्योती गाडवे, अमृता अकोले, बिंदू अग्रवाल, शीला वाकुरे, सागर साबळे, सुनिता पुदाले, मनिषा कुंडलकर, जयमाला चव्हाण, साखरबाई देवकर, मुरुडचे तलाठी एच. एस. देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. चारुशीला भोसले व महेश भोसले यांनी सुत्रसंचालन केले. मंडळ अधिकारी बी. व्ही. बेरुळे यांनी आभार मानले.
----------


Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा