जलसाठ्याजवळ जाणे टाळावे, लहान
मुलांनी पोहण्यासाठी जाऊ नये
जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांचे
आवाहन
लातूर, दि.4: मागील दोन वर्ष दुष्काळाच्या झळा सहन केलेल्या
लातूर जिल्ह्यात सध्या चांगला पाऊस पडत असुन आज पर्यंत अपेक्षीत पावसाच्या 139 टक्के
इतका पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाझर तलाव साठवण तलाव, शेततळे, लघु-मध्यम
प्रकल्प, बंधारे, नद्या, ओढे इ. मध्ये पाणी साठवण झाले आहे. हे जलसाठे पाहण्यासाठी
नागरिक सहपरिवार गर्दी करीत आहेत. तसेच विविध संघटना या जलसाठ्यांचे पूजन करण्यासाठी
जात असून शाळकरी/महाविद्यालयीन लहान मुले पोहण्यासाठी जात आहेत. ज्यामुळे पाय घसरुन
पडणे, पोहताना किंवा पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या युवकांचा आणि लहान मुलांचा बुडून मृत्यु
होण्याच्या घटना घडत आहेत. या जलसाठ्यांमध्ये कपारी, मोठ्या प्रमाणात गाळ, आदी साचलेले
असते त्यामुळे पोहणा-या व्यक्ती सुध्दा कपारीत, गाळात फसून बुडण्याच्या घटना घडू शकतात.
त्यामुळे नागरिकांनी आपल्या लहान मुलांना कोणत्याही परिस्थितीत जलसाठ्यात पोहण्यासाठी
पाठवू नये, तसेच स्वत: आपल्या परिवारासह या जलसाठ्यावर जाण्याचे टाळावे.
सध्या वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे या जलसाठ्याजवळ
दुषित पाण्यामुळे रोगराई पसरु शकते. भारतीय हवामान खात्याच्या अनुमानानुसार पुढील मान्सुन
कालावधीमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता असून त्यामुळे पुलावरुन पाणी वाहत असताना
कोणीही स्वत: किंवा वाहनासह पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नये कारण पाण्याचा प्रवाह
हा मानवाच्या आणि वाहनाच्या आवाक्या बाहेरील असतो त्यामुळे प्रवाहात वाहून जाण्याची
शक्यता नाकारता येत नाही. जलसाठ्यांच्या सभोवतालची माती, मुरुम हे पाण्यामुळे अस्थिर
होतात त्यामुळे पाय घसरुन पडण्यासारख्या घटणा घडु शकतात, म्हणुन जलसाठ्यामध्ये जलपूजन
करण्याचे टाळावे. मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झालेली असून मोठ्या
प्रमाणात शेततळे घेण्यात आले आहेत यामध्ये जड पाणी, गाळ असतो त्यामुळे पोहणे नैसर्गीकरीत्या
उचित ठरत नाही. त्यामुळे कोणीही जलसाठ्याजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठ्यावर पोहण्यासाठी
पाठवू नये शाळा महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थांना याबाबत सुचित करावे,
जिल्हाधिकारी कार्यालयात व तहसील स्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले असून
आपत्कालीन परिस्थितीमध्ये नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्रमांक 02382-220204 व टोल फ्री
क्रमांक 1077 किंवा व्हाट्स अप (whats up) मेसेज देण्यासाठी 8446451077 वर संपर्क साधावा असे
आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment