उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता

पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. 18 (जिमाका):  राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क,  आणि ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये 1 लक्ष रुपये, 75 हजार रुपये, 50 हजार रुपये आणि 25 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येते. तसेच राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी 50 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र तसेच राज्यातील प्रत्येक महसूल विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व उत्कृष्ट सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येते.

तरी सन 2022-23 या वर्षातील पुरस्कारासाठी इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील तीन प्रतीतील अर्ज 22 जानेवारी 2024 ते 9 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आपल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन राज्याच्या ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत