शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर, दि. 7 : शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद (ता.06) कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आत्मा व कृषी महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.
हवामान बदल, एल-निनो परिस्थिती आणि हवामानानुसार शेती व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती मनीषा बांगर होत्या. सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिगंबर पेरके व विस्तार विद्वेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सूर्यवंशी यांनी बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम व उपाययोजना स्पष्ट केल्या.कीटकशास्त्रज्ञ डॉ. दयानंद मोरे यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. डॉ. विजय भामरे यांनी मित्र कीटकांचे महत्त्व व जैविक नियंत्रणाविषयी माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्र, मांजरा येथील डॉ. पी. एच. उलेमाले यांनी फलोत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान व बागायती पिकांचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी श्रीकृष्ण शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यांनी हवामान-स्मार्ट व संशोधनाधारित शेतीचे अनुभव मांडले.
कार्यक्रमात शेतकरी, शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांमध्ये थेट संवाद झाला. शाश्वत शेती, पीक व्यवस्थापन, मृदा व पाणी व्यवस्थापन यावर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविणे हा कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी तिवडे यांनी केले. विजयकुमार गुडले आभार मानले.
***
Comments
Post a Comment