मत्स्यपालकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावरील प्रशिक्षण उत्साहात
मत्स्यपालकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावरील प्रशिक्षण उत्साहात
लातूर, दि. ३ (जिमाका) : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मत्स्यपालकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, कौशल्य विकास आणि जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने"आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक जाळी व बोटी आणि मत्स्य हाताळणी व विपणन"या विषयावरील एकदिवसीय जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
महाराष्ट्र शासनाचे मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, लातूर तथा दयानंद विज्ञान महाविद्यालयातील प्राणिशास्त्र व मत्स्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे पदाधिकारी, पीएमएमएसवाय प्रकल्पधारक मत्स्यशेतकरी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. बेल्लाळे होते. प्राणीशास्त्र व मत्स्य विभागाचे विभागप्रमुख डॉ. रवी सोळुंके, शासनाच्या मत्स्यव्यवसायविभागाच्यासहाय्यक आयुक्त तेजस्विनी करळे यांनी आधुनिक मत्स्यव्यवसायातील संधी, शाश्वत उत्पादन, कौशल्य विकास आदींसह शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
तांत्रिक सत्रात मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर येथील प्रा. डॉ. सोमनाथ यादव यांनी बायोफ्लॉक व रीसर्क्युलेटरी अॅक्वाकल्चर सिस्टीम (आरएएस) तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. वैज्ञानिक मत्स्यपालन, उत्पादनवाढ, खर्च नियंत्रण आणि उद्योजकतेच्या संधी याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी नि. मा. साळुंके यांनी माशांची शास्त्रीय हाताळणी, शीतसाखळी, काढणीनंतरचे नुकसान टाळण्याचे उपाय, मत्स्य विपणन आणि मूल्यवर्धन याविषयी मार्गदर्शन केले.
हमजा सय्यद यांनी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना, जलाशयातील केज कल्चर, आधुनिक मत्स्य जाळी व बोटी तसेच विविध अनुदान योजनांची माहिती देत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.प्रशिक्षणादरम्यान उपस्थितांनी विविध विषयांवरील शंकांचे निरसन करून घेतले.
*****
Comments
Post a Comment