आंबिया बहारमध्ये फळ पिकांसाठी विमा योजना लागू
आंबिया बहारमध्ये फळ पिकांसाठी विमा योजना लागू
लातूर, दि. ०५ (जिमाका): सन २०२६-२०२७ या वर्षात आंबिया बहारमध्ये आंबा, डाळिंब, केळी, पपई व द्राक्ष या पिकांसाठी पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना लातूर जिल्ह्यातील अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळामध्ये लागू करण्यात आली आहे.
ही योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रात नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशीलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. लातूर जिल्ह्यात ही योजना बजाज अलीयान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि पुणे या विमा कंपनी मार्फत कार्यान्वित केली जात आहे.
जिल्ह्यातील अधिसूचित फळपिके व महसूल मंडळ
लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, शिरुर अनंतपाळ, उदगीर, अहमदपूर, चाकूर, जळकोट, देवणी या सर्व तालुक्यातील सर्व महसूल मंडळासाठी आंबा फळपिकासाठी ही योजना लागू असून यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर, २०२६ आहे. तर संरक्षित रक्कम १ लाख ७० हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता ८ हजार ५०० रुपये इतका आहे. डाळींब या पिकासाठी लातूर तालुक्यातील तांदूळजा, मुरुड, औसा तालुक्यातील औसा, लामजना, किनीथोट, किल्लारी, बेलकूंड, भादा, उजनी, निलंगा तालुक्यातील निलंगा, औराद शहाजनी, रेणापूर तालुक्यातील कारेपूर व पानगाव, उदगीर तालुक्यातील नागलगाव, हेर, अहमदपूर तालुक्यातील किनगाव, अहमदपूर व खंडाळी, चाकूर तालुक्यातील चाकूर, नळेगाव, वडवळ ना. या महसूल मंडळांमध्ये ही योजना लागू राहील. यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत १४ जानेवारी, २०२७ पर्यंत आहे. विमा संरक्षित रक्कम १ लाख ६० हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता ८ हजार रुपये इतका आहे.
केळी पिकासाठी लातूर तालुक्यातील तांदुळजा, औसा तालुक्यातील किल्लारी, मातोळा व भादा, अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर, खंडाळी, किनगाव, शिरुर ताजबंद, अंधोरी व हाडोळती, चाकूर तालुक्यातील चाकूर या महसूल मंडळांमध्ये ही योजना लागू राहील. यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत आहे. विमा संरक्षित रक्कम १ लाख ७० हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता ८ हजार ५०० रुपये इतका आहे.
पपई पिकासाठी औसा तालुक्यातील उजनी, निलंगा तालुक्यातील निलंगा, रेणापूर तालुक्यातील कारेपूर, उदगीर तालुक्यातील देवर्जन, अहमदपूर तालुक्यातील हाडोळती या महसूल मंडळांमध्ये ही योजना लागू राहील. यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत आहे. विमा संरक्षित रक्कम ४० हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता २ हजार रुपये इतका आहे.
द्राक्ष पिकासाठी औसा तालुक्यातील औसा, लामजना, किनीथोट, किल्लारी, बेलकुंड, भादा, निलंगा तालुक्यातील निलंगा, औराद शहाजनी, आंबुलगा, कासार बालकुंदा, रेणापूर तालुक्यातील कारेपूर, उदगीर तालुक्यातील मोघा व देवर्जन, चाकूर तालुक्यातील नळेगाव व शेळगाव या महसूल मंडळांमध्ये ही योजना लागू राहील. यासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत आहे. विमा संरक्षित रक्कम ३ लाख ८० हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता १९ हजार रुपये इतका आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळबाग विमा योजना तसेच कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदार शेतकऱ्यांव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेतकरी करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. तसेच सहभागी होण्यासाठी ऍग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक राहील. अधिक माहितीसाठी संबंधित विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी बालाजी जगताप (भ्रमणध्वनी क्र. 9145598736) यांच्याशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी केले.
*****
Comments
Post a Comment