लातूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी युडीआयडी कार्ड शिबिरांचे आयोजन
लातूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी
युडीआयडी कार्ड शिबिरांचे आयोजन
• सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष उपक्रम
लातूर, दि. ०५ : राज्य शासनामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत असलेल्या 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत लातूर जिल्ह्यातील सर्व १० तालुक्यांमधील दिव्यांग बांधवांना युनिक डिझॅबिलिटी आयडी (युडीआयडी) प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत लातूर तालुक्यासाठी ऑक्टोबर महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी विशेष शिबीर पार पडणार आहे. निलंगा व शिरूर अनंतपाळ तालुक्यासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात ७ ऑक्टोबर २०२६ रोजी शिबीर आयोजित केले जाणार आहे. यासोबतच उदगीर, देवणी व जळकोट तालुक्यांसाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात १४ ऑक्टोबर रोजी, तर अहमदपूर व चाकूर तालुक्यांसाठी १६ ऑक्टोबर रोजी अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात विशेष शिबीर होणार आहे. तसेच रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात २८ ऑक्टोबर रोजी आणि औसा येथील ग्रामीण रुग्णालयात ३० ऑक्टोबर रोजी या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व १० तालुक्यांतील संबंधित दिव्यांग बांधवांनी युडीआयडी कार्ड मिळवण्यासाठी आयोजित या विशेष शिबिरांमध्ये नोंदणी करून आपले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन लातूर जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत करण्यात आले आहे.
****

Comments
Post a Comment