लातूर जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत ‘महाउपलब्धी’ मोबाईल ॲपबाबत निवृत्तीवेतनधारकांना मार्गदर्शन

लातूर जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत ‘महाउपलब्धी’ मोबाईल ॲपबाबत निवृत्तीवेतनधारकांना मार्गदर्शन लातूर, दि. ०६ (जिमाका) : निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना विविध
सेवा अधिक सुलभ व गतिमान पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी वित्त विभागाने ‘महाउपलब्धी’ हे मोबाईल ॲप कार्यान्वित केले आहे. या ॲपची माहिती, वापर करण्याची पद्धत तसेच ते कार्यान्वित करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी लातूर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने कोरे गार्डन सभागृह येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला लातूर जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील या होत्या. यावेळी लातूर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त अपर कोषागार अधिकारी ए. के. भुसणे, अपर कोषागार अधिकारी एम. आर. गुट्टे, प्रभारी अपर कोषागार अधिकारी एस. डी. तारळकर व प्रभारी अपर कोषागार अधिकारी आर. डी. माने यांची प्रमुख उपस्थिती होती. वित्त विभागाच्या लेखा व कोषागारे प्रधान सचिव डॉ. रिचा बागला तसेच मुंबई लेखा व कोषागारे संचालक श्रीमती दीपा देशपांडे आणि त्यांच्या पथकाने 'पीपीटी'च्या माध्यमातून दूरदृश्य प्रणालीद्वारे 'महाउपलब्धी' मोबाईल ॲपची सविस्तर माहिती दिली. यामध्ये ॲपचे स्वरूप, त्याचा वापर, ते कार्यान्वित करण्याची प्रक्रिया तसेच निवृत्तीवेतनधारकांसाठी उपलब्ध होणाऱ्या विविध सुविधांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय ॲप वापरताना येणाऱ्या विविध तांत्रिक व इतर अडचणींचे निरसनही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. डी. तारळकर यांनी केले. लातूर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. भुसणे यांनीही उपस्थित निवृत्तीवेतनधारकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानामुळे निवृत्तीवेतनाशी संबंधित सेवा अधिक सुलभ होत आहेत, त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांनी या नवीन डिजिटल सुविधांचा सकारात्मकतेने स्वीकार करावा. जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील यांनी सर्व निवृत्तीवेतनधारकांनी 'महाउपलब्धी' मोबाईल ॲपचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच ॲपचा वापर करताना काही अडचण आल्यास कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले. निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल माध्यमातून सेवा सहज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी आर. डी. माने, श्री. सूर्यवंशी, सतीश घुट्टे, बी. एम. पांचाळ, अमोल कुलकर्णी, शिवदर्शन बिराजदार, सूरज साळुंके, अमोल सिरसाट, शिवलिंग उटगे, नामदेव काकरे आणि शरद कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत