16 मे 2022 रोजी राष्ट्रीय डेंग्यु दिन साजरा करण्याचे आवाहन

 

16 मे 2022 रोजी

राष्ट्रीय डेंग्यु दिन साजरा करण्याचे आवाहन

 

         लातूर,दि.13 (जिमाका)-केंद्र शासनाने मागील वर्षाप्रमाणे राष्ट्रीय डेंग्यू दिन दिनांक 16 मे 2022 रोजी राज्यात सर्वत्र साजरा करण्याविषयी आदेशीत केले आहे.

          डेंग्यू ताप हा विशिष्ठ विषाणूमुळे होतो.डेंग्यूचा प्रसार हा एडीस एजिप्टाय नावाच्या डासांमुळे होतो. सदर डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.कोणतेही पाणी 8 दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालून अंडयाचे रुपांतर डासात होते. त्यानुषंगाने कोणतेही साठवलेले पाणी 8 दिवसापेक्षा जास्त ठेवू नये ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

       सध्या उन्हाळा सुरु आहे. जिल्हयातील बऱ्याच गावामध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात न झाल्याने लोकांची पाणी साठविण्याची प्रवृत्ती आढळूण येणे नाकारता येत नाही. त्यानुषंगाने अशा साठवलेल्या पाण्यात एडीस एजिप्टाय डास अंडी घालून डासोत्पत्ती होते. सदरहू डासांची उत्पत्ती कमी करणे / नियंत्रणात ठेवणे यासाठी लोकांना आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे.लोक सहभागाशिवाय या आजाराचे नियंत्रण शक्य नाही.

      राष्ट्रीय डेंग्यू दिन दिनांक 16 मे 2022 रोजी या ही वर्षी साजरा करण्यात येणर आहे. मागील वर्षीप्रमाणेच डेंग्यू विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जनतेचा सक्रिय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमांव्दारे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करणे हा मोहिमेचा उद्देश आहे.

      मागील तीन वर्षात लातूर जिल्ह्यातील डेंग्यू आजाराची परिस्थिती पूढील प्रमाणे आहे. सन 2019 मध्ये  संवशयीत 216 दुषित 53 तर मृत्यु 00, 2020 मध्ये संवशयीत 16 दुषित 02 तर मृत्यु 00, 2021 मध्ये संवशयीत 132 दुषित 39 तर मृत्यु 00 तर 13 मे 2022 पर्यंत संवशयीत 12 दुषित 01 तर मृत्यु 00 असा आहे.

       जनतेस नम्र आवाहन- राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत किटकामार्फत विशेषतः डासामार्फत प्रसार होणाऱ्या हिवताप, डेग्यु, चिकुनगुन्या, हत्तीरोग, जे.ई.अशा रोगाच्या नियंत्रणासाठी नियमित कार्य आरोग्य विभागामार्फत करण्यात येते. या रोगावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सर्व स्तरावरुन नागरीकांचे सहकार्य अपेक्षीत आहे.जणेकरुन या रोगावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होईल.

       रोगप्रसारक डास व त्याची उत्पत्ती :- डासाच्या जीवनचक्रामध्ये चार अवस्था (अंडी,अळी,कोष व प्रौढ डास) असून तीन अवस्था हया पाण्यातील आहेत. पाण्यातील अवस्था नष्ट केल्यास डासाची उत्पत्ती रोखणे शक्य होईल. अंडीपासून डास तयार होण्यासाठी सर्व साधारपणे 8 ते 10 दिवसाचा कालावधी लागतो. डेग्यु व चिकुनगुन्या या रोगाचा प्रसार करणाऱ्या एडिस इजिप्टाय या डासाची उत्पत्ती प्रामुख्याने आठ दिवसापेक्षा जास्त साठलेल्या स्वच्छ पाणीसाठयामध्ये होतो.उदाः हौद, माठ, रांजन, रिकामी टायर्स,नारळाच्या करवंटया कुलरमधील पाणी ओव्हरहेड टॅक,भंगार सामान घर व घराच्या परिसरातील सर्व पाणीसाठे.

        किटकजन्य रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना :- किटकजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी जनतेमार्फत पूढील प्रमाणे उपाययोजना राबविणे. आठवडयातून किमान 1 वेळेस पाण्याचे सर्व साठे रिकामे करुन घासूनपुसून स्वच्छ कोरडे करुन पुन्हा वापरावीत. पाणीसाठे घट्ट झाकून ठेवावी. डबकी व पाण्याच्या टाक्या यामध्ये डासअळी भक्षक गप्पी मासे सोडावेत पाणी वाहते करणे,डबके बुजविणे,डासोत्पत्तीस्थाने नष्ट करणे,साठलेल्या डबक्यात नाल्यात तेल वंगन टाकावे. झोपतांना अगरबत्ती व मच्छरदाणीचा वापर करावा. अंगभर कपडे घालावेत. आवश्यकते नुसार अबेटींग करणे, धुर फवारणी करणे इ.

             आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात घरोघरी किटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येते व गरजेनुसार ॲबेटींग करण्यात येते. ताप आल्यास तसेच उपरोक्त रोग लक्षणे आढळून आल्यास तात्काळ रक्ताची तपासणी करुन घ्यावी. सर्व प्रा.आ.केंद्र, ग्रामीण रुग्णांलय व जिल्हा रुग्णांलयाच्या स्तरावर डेंग्युच्या निदानाची मोफत सोय उपलब्ध्‍ आहे. जेणे करुन दवाखान्यात जावून आवश्यकतो उपचार घ्यावा असे आवाहन उप संचालक, आरोग्य सेवा परिमंडळ हेमंतराव बोरसे, मुख्यकारी अधिकारी अभिनव गोयल, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) डॉ.एस.बी. ढगे, जिल्हा शल्यचिकित्सक एल.एस. देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी एच.व्ही. वडगांवे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शेख आर.आर. यांनी केले आहे.

 

                                                         000

               

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित