पीएम यशस्वी योजना: लातूर जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
*वृत्त क्र. : 450*
पीएम यशस्वी योजना: लातूर जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी
शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. ०३ (जिमाका) : 'पीएम यशस्वी' अंतर्गत 'टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, ईबीसी अँड डीएनटी स्टुडंट्स' या योजनेची शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मध्ये लातूर जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर आपले अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत देण्यात आली आहे.
या योजनेसाठी लातूर जिल्ह्यातील नामांकित (टॉप क्लास) शाळा किंवा कॉलेजमध्ये इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी मध्ये शिकणारे आणि इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागासलेले तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी आहे, असे सर्व विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. या कल्याणकारी योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्ह्यातील सर्व संबंधित शाळा आणि महाविद्यालयांनी तात्काळ पुढाकार घेऊन आपल्या संस्थेतील १०० टक्के पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदतीत नॅशनल पोर्टलवर भरून घ्यावेत, एकही पात्र विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक अभय प्र. अटकळ यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment