रस्ते अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

वृत्त : ३७४ रस्ते अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड · रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा लातूर, दि. ९ : जिल्ह्यात रस्ते अपघातामध्ये होणारे मृत्यू रोखण्यासाठी वाहतूक नियमांविषयी जनजागृतीवर भर देण्याची आवश्यक आहे. चारचाकी चालविताना शीट बेल्टचा वापर आणि दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर केल्यास अपघाती मृत्यूंची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता अलका डाके, एनआयसीचे पुरुषोत्तम रुक्मे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. अपघातांविषयी माहिती संकलनासाठी आणि त्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीचे संनियंत्रण करण्यासाठी केंद्र शासनाने आयआरएडी पोर्टल कार्यान्वित केले आहे. जिल्ह्यातील सर्व अपघातांची माहिती संबंधित यंत्रणांनी विहित कालावधीत या पोर्टलवर अपलोड करावी. यामध्ये विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड म्हणाले. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे नागरिकांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अपघाती मृत्यूमधील जवळपास ७० टक्के मृत्यू हे दुचाकी अपघातातील आहेत. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर केल्यास हे मृत्यू रोखणे शक्य आहे. त्यामुळे दुचाकी चालविताना सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले. तसेच महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांवर गतिरोधक बसविल्यास महामार्गावरील अपघात कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत