खरीप हंगाम २०२६: राष्ट्रीय खाद्यतेल अभियान प्रमाणित बियाणे पुरवठ्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी आणि सहकारी संस्थांकडून अर्ज मागविले
खरीप हंगाम २०२६: राष्ट्रीय खाद्यतेल अभियान
प्रमाणित बियाणे पुरवठ्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी आणि
सहकारी संस्थांकडून अर्ज मागविले
लातूर, दि. १० : खरीप हंगाम २०२६ मध्ये 'राष्ट्रीय खाद्यतेल अभियान - तेलबिया' योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लातूर जिल्हा कृषी विभागाने पात्र इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांकडून प्रमाणित बियाणे पुरवठादार संस्था म्हणून अर्ज मागवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व संबंधित संस्थांनी आपले अर्ज १२ जून २०२६ पर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, लातूर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत प्रामुख्याने सोयाबीन आणि इतर तेलबियांच्या प्रमाणित बियाण्यांचे वितरण केले जाणार आहे. यामध्ये ०५ वर्षांच्या आतील अधिसूचित वाण आणि ५ ते ८ वर्षांच्या आतील अधिसूचित वाण या बियाणांचा समावेश राहील. बियाणे पुरवठादार संस्था म्हणून इच्छुक संस्थेची 'साथी' पोर्टलवर नोंदणी झालेली असणे अनिवार्य आहे. बियाण्याची गुणवत्ता, शिफारस, उत्पादन कालावधी, बियाणे उत्पादकांची नोंदणी, तसेच प्रचलित बियाणे कायदे, नियम व इतर विहित अटींची पूर्तता करणारी संस्था असावी. गुणवत्ता आणि उगवणक्षमतेची हमी असलेल्या अधिसूचित वाणांच्या (०५ वर्षांच्या आतील तसेच ५ ते ८ वर्षांच्या आतील) प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करणे आवश्यक राहील. बियाण्यांचा पुरवठा तालुकास्तरावर केला जाणार असल्याने, संबंधित संस्थेकडे प्रत्येक तालुकानिहाय अधिकृत वितरक असणे आवश्यक आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
****
Comments
Post a Comment