प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला १० वर्षे पूर्ण; विशेष आरोग्य शिबिरांमध्ये ३४५८ गरोदर मातांची तपासणी

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला १० वर्षे पूर्ण; विशेष आरोग्य शिबिरांमध्ये ३४५८ गरोदर मातांची तपासणी लातूर, दि. १० : भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला ९ जून २०२६ रोजी १० वर्षे पूर्ण झाली. ९ जून २०१६ रोजी सुरू झालेल्या या अभियानांतर्गत दर महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला गर्भवती महिलांना मोफत, सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण प्रसूतीपूर्व आरोग्य सेवा पुरविल्या जातात. गेल्या दहा वर्षांत उच्च जोखीम गर्भधारणा असलेल्या महिलांची लवकर ओळख, योग्य व्यवस्थापन आणि संदर्भ सेवा बळकट करण्यात या अभियानाने मोलाची भूमिका बजावली आहे. या महत्वपूर्ण टप्प्याचे औचित्य साधून देशभर ‘पीएमएसएमए’ची १० वर्ष: सुरक्षित गर्भधारणा, निरोगी माता, सक्षम भारत या संकल्पनेअंतर्गत विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष दिना निमित्त लातूर परिमंडळाच्या आरोग्य उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांनी जवळा बु. (ता. लातूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य शिबिराचा आढावा घेतला. या शिबिरात एकूण ५२ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली, तर १२ अतिजोखमीच्या मातांना विशेष सेवा व संदर्भ सेवा पुरविण्यात आल्या. यावेळी डॉ. रेखा गायकवाड यांनी उपस्थित मातांना आहार, विश्रांती आणि गरोदरपणातील धोक्याच्या लक्षणांबाबत मार्गदर्शन केले. विशेष शिबिराच्या दिवशी ग्रामीण भागातील एकूण ३ हजार ४५८ गरोदर मातांना उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आरोग्य सेवा देण्यात आल्या. यामध्ये ६५५ अतिजोखमीच्या मातांना विशेष उपचार व आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमावेळी प्रभारी सहायक संचालक (वैद्यकीय) डॉ. प्रीती बादाडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. नितीन बोडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. भताने, डॉ. तोंडारे, सी.पी.एम. पवन वाडेकर, संदीप यादव यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत