जून महिन्याची वेतन देयके नवीन प्रणालीद्वारेच; लातूर कोषागार कार्यालयातर्फे आज 'नवीन सेवार्थ प्रणाली'चे उजळणी प्रशिक्षण
जून महिन्याची वेतन देयके नवीन प्रणालीद्वारेच;
लातूर कोषागार कार्यालयातर्फे आज 'नवीन सेवार्थ प्रणाली'चे उजळणी प्रशिक्षण
लातूर, दि. १० : शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहे जून-२०२६ ची वेतन देयके आता 'नवीन सेवार्थ प्रणाली'द्वारेच तयार केली जाणार आहेत. या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी लातूर कोषागार कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी आणि वेतनविषयक कामकाज पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुरुवार, ११ जून २०२६ रोजी एका विशेष उजळणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या सूचनेनुसार जून २०२६ पासून सर्व वेतन देयके नवीन सेवार्थ प्रणालीद्वारेच संकलित करून, ऑनलाईन पद्धतीने ई-स्वाक्षरीसह कोषागारात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रणालीबाबत यापूर्वी १० मार्च २०२६ रोजी प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा डेटा क्लीनिंग व अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. आता प्रत्यक्ष नवीन प्रणालीतून वेतन काढण्यापूर्वी कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी हे उजळणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
उपस्थिती अनिवार्य; पुन्हा प्रशिक्षण नाही
या प्रशिक्षणास सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच वेतन देयकांशी संबंधित कामकाज पाहणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य आहे. हे प्रशिक्षण पुन्हा आयोजित केले जाणार नसल्याने कोणीही अनुपस्थित राहू नये, असे जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
असे असेल प्रशिक्षणाचे वेळापत्रक
हे प्रशिक्षण लातूर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील 'डीपीडीसी हॉल' येथे दोन सत्रांत पार पडणार आहे. पहिल्या सत्रात सकाळी ११:३० ते दुपारी १ दरम्यान जिल्ह्यातील सर्व उपकोषागार कार्यालय स्तरावरील आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी, तर दुसऱ्या सत्रात दुपारी ३:३० ते सायंकाळी ५ दरम्यान लातूर कोषागार कार्यालय मुख्यालय स्तरावरील अधिनस्त सर्व आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण होईल. प्रशिक्षण ठरलेल्या वेळेवरच सुरू होणार असल्याने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन लातूरच्या कोषागार अधिकारी डॉ. उज्वला भा. पाटील यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment