भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक
वृत्त : 375
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी
शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक
लातूर, दि. ९ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या, परंतु समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जात असून, या शैक्षणिक वर्षापासून योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून, शालेय अभ्यासक्रमासाठी ३० जूनपर्यंत, तर अकरावी, बारावी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १५ जुलैपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत.
गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, अशाच विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी पात्र ठरविले जाईल; मात्र जे विद्यार्थी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणार नाहीत, त्यांना वसतिगृह किंवा स्वाधार या दोन्हीपैकी कोणतीही योजना मिळणार नाही. ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृहे नाहीत, तेथे हा नियम शिथिल असला तरी, भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करून ठेवावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment