खरीप हंगाम २०२६: तूर, मूग, उडीद व ज्वारीच्या प्रमाणित बियाण्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
खरीप हंगाम २०२६: तूर, मूग, उडीद व ज्वारीच्या प्रमाणित बियाण्यांसाठी
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. ९: खरीप हंगाम २०२६ साठी विविध शासकीय योजनांतर्गत प्रमाणित बियाणे वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून, लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक महेशकुमार तिर्थकर यांनी शेतकऱ्यांना 'महाडीबीटी' प्रणालीद्वारे त्वरित अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. 'कडधान्य आत्मनिर्भरता अभियाना'अंतर्गत तूर, मूग आणि उडीद या पिकांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या योजनेतील तरतुदींनुसार पाच वर्षांच्या आतील वाणासाठी ६ हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान, पाच ते दहा वर्षांच्या आतील वाणासाठी ३ हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान दिले जाईल. सन २०२६ हे 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून साजरे केले जात आहे. याची दखल घेत, या योजनेतील एकूण लाभार्थ्यांपैकी किमान ३० टक्के निवड महिला शेतकऱ्यांची केली जाणार आहे.
या योजनेसाठी शेतकऱ्यांनी 'अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी'चा वापर करून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. लाभार्थी निवड 'प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर केली जाईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच, आपल्या परिसरातील मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा उपकृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्जदार शेतकऱ्यांना योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असलेल्या सर्व अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment