लातूर जिल्ह्यात खत आणि बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध; साठेबाजी किंवा लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर होणार सक्त कारवाई!
लातूर जिल्ह्यात खत आणि बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध;
साठेबाजी किंवा लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर होणार सक्त कारवाई!
लातूर, दि. १० : सध्या जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्वतयारी वेगाने सुरू असून शेतकऱ्यांची खत व बियाणे खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, लातूर जिल्ह्यामध्ये पुरेशा प्रमाणात खत आणि बियाण्यांचा साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी कोणतीही धावपळ करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. जमिनीमध्ये ८० ते १०० मि.मी. पाऊस पडून पुरेशा प्रमाणात ओलावा तयार झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये, तसेच खत खरेदी करताना केवळ एका विशिष्ट खताच्या ग्रेडचाच आग्रह धरू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी खते व बियाण्यांची विक्री छापील किमतीपेक्षा (एमआरपी) जास्त दराने करू नये, तसेच खत किंवा बियाण्यांसोबत इतर नको असलेल्या निविष्ठांची सक्तीने विक्री (लिंकिंग) करू नये. खताचा साठा उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ केल्यास किंवा बेकायदेशीर साठेबाजी केल्यास संबंधित विक्रेत्यांवर तात्काळ व सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
लातूर जिल्ह्यासाठी मे २०२६ अखेर एकूण २७ हजार ५७४ मे. टन रासायनिक खत आवंटन मंजूर होते, ज्याच्या तुलनेत २९ हजार ४१९ मे. टन एवढा पुरवठा झालेला आहे. मार्च २०२६ अखेरचा शिल्लक साठा धरून आजमितीस जिल्ह्यात एकूण ६५ हजार ३७५ मे. टन खत साठा उपलब्ध आहे. यामध्ये युरियाचा ८ हजार २५६ मे. टन पुरवठा झाला असून ९ हजार ७७९ मे. टन साठा उपलब्ध आहे. डी.ए.पी. चा २ हजार ३१ मे. टन पुरवठा झाला असून ४ हजार ९९३ मे. टन साठा उपलब्ध आहे. संयुक्त खतांचा १२ हजार ९८ मे. टन पुरवठा झाला असून ३५ हजार ४६१ मे. टन साठा उपलब्ध आहे. एस.एस.पी. चा ६ हजार ८३४ मे. टन पुरवठा झाला असून १४ हजार २५३ मे. टन साठा उपलब्ध आहे, तर एम.ओ.पी. चा २०० मे. टन पुरवठा मंजूर झाला असून ८९० मे. टन साठा सद्यस्थितीत उपलब्ध आहे.
जिल्ह्यात पीकनिहाय पेरणी क्षेत्राच्या प्रमाणात बियाण्यांची उपलब्धता देखील पुरेशी आहे. बियाणे आणि खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा परिषद मोहीम अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असून, हे पथक तक्रार प्राप्त होणाऱ्या कृषी सेवा केंद्रांची तात्काळ तपासणी करून कठोर कारवाई करत आहे. याशिवाय तालुकानिहाय गुण नियंत्रण निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, ते नियमित तपासणी करून त्रुटी आढळणाऱ्या केंद्रांवर कायदेशीर कारवाई करत आहेत.
शेतकऱ्यांना प्रत्येक कृषी सेवा केंद्रातील उपलब्ध खत साठ्याची अचूक माहिती मिळावी, यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेमार्फत विशेष ब्लॉग https://adozplatur.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding.html?m=1 आणि क्यूआर कोडची निर्मिती करण्यात आली आहे. खत व बियाण्यांच्या बाबतीत कोणतीही तक्रार, अडवणूक किंवा फसवणूक होत असल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या नजीकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
अ.क्र. खताचे नाव मे अखेर मंजूर आवंटन(मे.टन) मे अखेर पुरवठा
(मे.टन)
1 युरीया 8025 8256
2 डि.ए.पी. 5850 2031
3 एम.ओ.पी. 374 200
4 एन.पी.के. 9645 12098
5 एस.एस.पी. 3680 6834
एकुण 27574 29419

Comments
Post a Comment