‘युआयडीएआय’च्या नवीन आधार सेवा केंद्राचे लातूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

‘युआयडीएआय’च्या नवीन आधार सेवा केंद्राचे लातूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन लातूर, दि. ११ : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (युआयडीएआय) मुंबई प्रादेशिक कार्यालयामार्फत लातूर येथे सुरू करण्यात आलेल्या नवीन अद्ययावत आधार सेवा केंद्राचे उद्घाटन लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्तेवाड यांच्या हस्ते झाले. नागरिकांना जलद, सोयीस्कर आणि पारदर्शक आधार सेवा पुरवण्याच्या दृष्टीने हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. हे आधार सेवा केंद्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ते रेल्वे स्टेशन मार्गावरील आर्वीकर कॉम्प्लेक्स येथे स्थित असून आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार आहे. या केंद्रामध्ये नवीन नोंदणी, ५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट, डेमोग्राफिक दुरुस्ती आणि घटनास्थळीच तक्रार निवारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्यास युआयडीएआय मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक मंदार जेवरे आणि सेवा प्रदाता कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या केंद्रात नागरिकांच्या सोयीसाठी आधुनिक पायाभूत सुविधा, दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सोय आणि सुलभ टॉयलेट सुविधा उपलब्ध असून अखंड सेवा वितरणासाठी एका समर्पित एएसके व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिक युआयडीएआयच्या अपॉइंटमेंट पोर्टलवर (https://bookappointment.uidai.gov.in) आधीच अपॉइंटमेंट बुक करू शकतात, तर जिओ-टॅग केलेली एएसके ठिकाणे भुवन आधार पोर्टलवर (https://bhuvan-app3.nrsc.gov.in/aadhaar) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. लातूरमधील हे आधुनिक आधार सेवा केंद्र नागरिकांसाठी जलद व पारदर्शक सेवा उपलब्ध करून देईल. डिजिटल इंडियाची संकल्पना साकार करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी यावेळी व्यक्त केला. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास