वसतिगृह प्रवेशासाठी ऑफलाईन अर्जाची संधी
वसतिगृह प्रवेशासाठी ऑफलाईन अर्जाची संधी
लातूर, दि. 10:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणीमुळे अर्ज न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी स्थानिक वसतिगृहाचे गृहप्रमुख किंवा गृहपाल यांच्याकडे संपर्क साधून अर्ज भरावेत, असे आवाहन सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
जिल्ह्यात मुलांचे १४ व मुलींचे १२ अशी एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. लातूर शहरात मुलांचे ६ व मुलींचे ४ वसतिगृह आहेत. औसा, निलंगा, उदगीर, देवणी, चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे एक व मुलींचे एक वसतिगृह आहे. अहमदपूर येथे मुलांचे दोन व मुलींचे दोन, रेणापूर येथे मुलांचे एक आणि जळकोट येथे मुलींचे एक वसतिगृह कार्यरत आहे.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी कनिष्ठ महाविद्यालय व बिगर व्यावसायिक वरिष्ठ महाविद्यालय वर्गाची प्रवेश निवड यादी प्रसिद्ध झाली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू असून अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे.
मागील वर्षी अंतिम वर्षात शिकणारे व स्वाधार योजनेसाठी अर्ज केलेले काही विद्यार्थी तांत्रिक कारणांमुळे चालू वर्षी वसतिगृह प्रवेश अर्ज करू शकले नाहीत. तसेच महाविद्यालयीन प्रवेश उशिरा झाल्याने किंवा अन्य तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन अर्ज न भरू शकलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना जागेअभावी वसतिगृह प्रवेश न मिळाल्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. मात्र, वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी स्वतंत्र अर्जाची सुविधा उपलब्ध राहणार नाही, असेही त्यांनी कळवले आहे.
Comments
Post a Comment