दिव्यांग, 85 वर्षांवरील व्यक्तींचे मतदान करून घेण्यासाठी

 दिव्यांग, 85 वर्षांवरील व्यक्तींचे मतदान करून घेण्यासाठी

2 मे, 4 मे रोजी पथके जाणार मतदारांच्या घरी

·         विहित नमुन्यातील 12 डी अर्ज भरून दिलेल्या 2 हजार 356 मतदारांचा समावेश

लातूर, दि. 30 : मतदार यादीमध्ये नाव असलेल्या दिव्यांग आणि 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने टपाली मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार पात्र मतदारांकडून 12 (डी) अर्ज भरून घेण्याची कार्यवाही 17 एप्रिल 2024  पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत करण्यात आली आहे. यामधील पात्र मतदारांचे मतदान करून घेण्यासाठी लातूर लोकसभा मतदारसंघात 2 मे आणि 4 मे 2024 रोजी मतदान पथके घरोघरी जाणार आहेत. याबाबत संबंधितांना बीएलओ मार्फत पूर्वसूचना देण्यात आली आहे. 12 (डी) अर्ज भरून दिलेल्या मतदारांनी टपाली मतदानाचा हक्क बजाविणे बंधनकारक आहे. अशा मतदारांना मतदान केंद्रावर जावून मतदान करता येणार नाही, असे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

मतदारांकडून प्राप्त 12 (डी) अर्जांची छाननी केल्यानंतर 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले मतदारांची आणि दिव्यांग मतदारांची विधानसभा मतदारासंघनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. या मतदारांच्या घरी जावून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करून घेतले जाणार आहे. यासाठी संबंधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची मतदान पथके तयार केली आहेत. यामध्ये दोन मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी, व्हिडीओग्राफर आणि मायक्रो ऑब्झर्व्हर यांचा समावेश आहे. या मतदान प्रक्रियेमध्ये गोपनीयतेचा भंग होवू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहे. या सर्व प्रक्रियेचे व्हिडीओ शुटींग केले जाणार आहे. मतदाराची ओळख पटविण्याची प्रक्रिया नियमित स्वरुपाची राहणार आहे. तसेच सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे.

मतदान पथक 2 मे रोजी घरी आल्यानंतर काही कारणांमुळे संबंधित मतदार घरी उपस्थित नसल्यास, दुसऱ्या वेळी म्हणजेच 4 मे रोजी संबंधित मतदाराने घरी उपस्थित राहून मतदान करणे आवश्यक आहे. यादिवशीही संबंधित मतदाराने मतदानाचा हक्क न बाजाविल्यास त्याला मतदान केंद्रावर जावून आपले मतदान करता येणार नाही. लातूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, निलंगा आणि लोहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात 2 मे आणि 4 मे रोजी मतदान पथके घरोघरी जावून मतदान करून घेतील. तसेच उदगीर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात 2 मे, 3 मे आणि 4 मे या तीन दिवशी मतदान पथके घरोघरी जाणार आहेत.

लातूर लोकसभा मतदारसंघात टपाली मतदानासाठी पात्र 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 1 हजार 893 असून दिव्यांग मतदारांची संख्या 463 आहे. अशाप्रकारे एकूण 2 हजार 356 मतदारांचे घरोघरी जावून टपाली मतदान करून घेण्यात येणार असून यासाठी 130 मतदान पथके स्थापन करण्यात आली आहेत.

***** 



Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु