जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न महत्वाचे - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न महत्वाचे - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे


* सर्वाधिक मतदान होणाऱ्या 12 मतदान केंद्राच्या बीएलओ यांचा करणार सन्मान

* मतदार जागृतीसाठी प्रत्येक मतदान केंद्रनिहाय ‘वॉकथॉन’चे आयोजन



लातूर, दि. 2 : मतदान प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) भूमिका अत्यंत महत्वाची आहे. विशेषतः मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठीही त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.


लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, मतदार जागृती आदी बाबींचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा लातूर जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, लातूर ग्रामीणच्या सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, टपाली मतदानाच्या नोडल अधिकारी संगिता टकले, स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी रामदास कोकरे आणि नागेश मापारे यांच्यासह व्हीसीद्वारे सर्व सहायक निवडणूक अधिकारी उपस्थित होते.


लातूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत  येणाऱ्या विधानसभा मतदार संघातील मतदार जनजागृती व प्रत्यक्ष  मतदानादिवशी मतदारांना व मतदान प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या  सेवा-सुविधांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या, लातूर लोकसभा मतदारसंघात सुमारे 700 मतदान केंद्रावर मागच्या निवडणुकीत राज्याच्या सरासरी मतदानापेक्षा कमी मतदान झालेले आहे, आपण यावेळी 75 टक्केपेक्षा अधिक मतदानाचे लक्ष्य निर्धारीत करून कार्यरत आहोत. त्यामुळे सर्व बीएलओंनी कल्पकतेने काम करून मतदानाची टक्केवारी वाढेल, यादृष्टीने काम करावे. ज्या मतदान केंद्रावर जास्त मतदान होईल, अशा बारा बीएलओंचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने विशेष सन्मान केला जाईल, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी सांगितले. 


मतदार जागृतीसाठीचे उपक्रम यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. यामध्ये मतदार माहिती चीठ्ठ्यांचे शंभर टक्के वाटप करणे, त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या गावात 5 मे रोजी सकाळी 6 ते 8 व सायंकाळी 4 ते 6 या वेळेत मतदान केंद्रनिहाय नियोजन करून आशा सेविका, अंगणवाडी सेविका, तलाठी, ग्रामसेवक व विविध सामाजिक संस्थांच्या  सहकार्याने मतदान वॉकथॉनचे (गावफेरी) आयोजन करून मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणे. त्याचबरोबर प्रत्येक सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन-दोन गावे संबंधित अधिकाऱ्यांना दत्तक देवून स्वतःही काही दत्तक घेवून मतदान वाढीसाठी प्रयत्न करावेत.


बीएलओंनी मतदान केंद्रावर उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीची सोय, पिण्यासाठी थंड पाणी, मेडीकल कीट, ओआरएसची सुविधा उपलब्ध झाल्याची खात्री करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. मतदान माहिती चिठ्ठ्या वाटप व इतर कामावर देखरेख ठेवण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून नेमूण दिलेल्या कामात कोणीही हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

***

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु