खरीप - २०२४ हंगामासाठी जिल्हा आणि प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

  खरीप - २०२४ हंगामासाठी जिल्हा आणि प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

 

लातूर,दि.21(जिमाका)-  खरीप-२०२४ हंगामात लातूर जिल्ह्यातील कृषि निविष्ठा केंद्रांवरून बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषि निविष्ठा खरेदी करतांना गुणवत्ता व दर्जा बाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावर, तसेच प्रत्येक तालुकास्तरावर एक १० असे एकूण ११ तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव व जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सुभाष चोले यांनी दिली.

खरीप-२०२४ हंगामामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात आणि गुणात्मक दर्जाच्या कृषि निविष्ठा एमआरपी दराने उपलब्ध होण्यासाठी आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषि विभागातील गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत नियमित कृषि निविष्ठा विक्री केंद्रांची आणि कृषि निविष्ठांची तपासणी करण्यात येते.

 यानंतरही शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा विक्री केंद्रावरून कृषि निविष्ठांची खरेदी करताना काही अडचण अथवा खरेदी पश्चात खरीप हंगाम संपेपर्यंत कृषी निविष्ठांचा दर्जा व गुणवत्ता आदीबाबतीत संशय आल्यास अथवा त्यामध्ये आपली फसवणूक झाली, असे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांच्या तक्रारीचे वेळीच निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर एक व दहा तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ११ तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

संबंधित तालुक्यातील शेतकरी कृषि निविष्ठाबाबतची तक्रार नोंदवितांना संबंधित गुणनियंत्रण निरीक्षकांकडे, तक्रार निवारण कक्ष प्रमुखाकडे लेखी तक्रार अर्जासोबत कृषि निविष्ठांच्या खरेदीची पावती, सातबारा, होल्डींग आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी तक्रार अर्जावर आपला संपूर्ण पत्ता, गांव, तालुका व भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवावा.

या व्यतिरिक्त शेतकरी आपली तक्रार संबंधित तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी पंचायत समिती यांच्या कार्यालयात नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव व जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी सुभाष चोले यांनी केले आहे.

कृषि निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

गुणवत्ता व दर्जेदार निविष्ठा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच निविष्ठा खरेदी कराव्यात. निविष्ठा खरेदी करताना विक्रेत्याकडून पक्की पावती ज्यामध्ये बियाणांची जात, लॉट नंबर, उत्पादक दिनांक इत्यादी मजकूर असल्याची खात्री करावी. नोंदणीकृत निविष्ठाची व लेबल क्लेम असलेल्या निविष्ठांचीच खरेदी करावी.

तसेच खताच्या किंमतीत सद्यस्थितीत कोणत्याही प्रकरची वाढ झालेली नसून चढ्या भावाने कृषि निविष्ठांची विक्रेत्यांवर विक्री केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

बियाणे, खते व कीटकनाशक यांच्या गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्र.9404505620 असा आहे. तसेच 8788091401 / 7588178787 या क्रमांकावर व्हाट्सअपद्वारे तक्रार नोंदविता येईल. तसेच dsaolatur@rediffmail.com / adolatur@gmail.com या ई-मेल आयडी वर सुध्दा तक्रार मेलव्दारे पाठवता येईल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. जाधव यांनी कळविले आहे.

**** 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु