लातूरमधील युवक-युवतींसाठी नाशिक येथे एसएसबी प्रशिक्षण कोर्स प्रवेशाची संधी
लातूरमधील युवक-युवतींसाठी नाशिक येथे एसएसबी प्रशिक्षण कोर्स प्रवेशाची संधी
लातूर, दि. 17 (जिमाका): भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सेवा निवड मंडळ (एसएसबी) परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक रोड, नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात 5 ते 14 मे 2025 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 61 आयोजित करण्यात आले आहे. या कोर्सदरम्यान प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास आणि भोजन सुविधा दिली जाईल. तरी या प्रशिक्षणासाठी लातूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी 28 एप्रिल 2025 रोजी लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे (डीएसडब्ल्यू) यांच्या संकेतस्थळावरून एसएसबी-61 कोर्ससाठी प्रवेशपत्र आणि त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची मुद्रित प्रत पूर्ण भरून आणावी. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिलेली मुद्रित प्रतही आणता येईल.
या कोर्समध्ये प्रवेशासाठी संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (सीडीएसई-यूपीएससी) किंवा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी परीक्षा (एनडीए-यूपीएससी) उत्तीर्ण असावी आणि एसएसबी मुलाखतीसाठी पात्र ठरलेले असावे किंवा एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र ‘ए’ किंवा ‘बी’ श्रेणीत उत्तीर्ण असावे आणि एनसीसी गट मुख्यालयाने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी अथवा तांत्रिक पदवीधर कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीचे कॉल लेटर असावे किंवा विद्यापीठ प्रवेश योजनेसाठी (युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम) एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी शिफारस यादीत नाव असावे. यापैकी कोणतीही एक पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षणवर्गास येताना सोबत आणावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी training.pctcnashik@gmail.com या ईमेलद्वारे किंवा 0253-2451032 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 9156073306 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment