अनधिकृत बालगृहे, वसतिगृहे, अनाथ आश्रमांची माहिती देण्याचे आवाहन
अनधिकृत बालगृहे, वसतिगृहे, अनाथ आश्रमांची माहिती देण्याचे आवाहन
लातूर, दि. 21 (जिमाका): पुणे आणि जिल्ह्यात बेकायदेशीरपणे बालगृहे, वसतिगृहे आणि अनाथ आश्रम चालवले जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, या संस्थांमध्ये मुलांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015, सुधारित अधिनियम 2021 आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील तरतुदींचे उल्लंघन करणारी आहे.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 मधील कलम 42 नुसार, मान्यताप्राप्त नोंदणी प्रमाणपत्र नसलेली संस्था अथवा अशी संस्था चालवणाऱ्या व्यक्तीला एक वर्षापर्यंत कारावास, एक लाख रुपयांपेक्षा कमी नसलेला दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते, अशी तरतूद आहे. तरी आपल्या परिसरात अशा अनधिकृत संस्था आढळल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किंवा चाइल्ड हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा. मुलांवरील अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन लातूरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख यांनी केले आहे.
Comments
Post a Comment