लातूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी समितीची बैठक
लातूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी समितीची बैठक
लातूर, दि. 8 (जिमाका) : महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बस करीता विनियम) नियम 2011 च्या अधिसूचनेनुसार, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत आढावा घेण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक झाली.
या बैठकीला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अश्वजित जानराव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर, उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) एस. डी. साळवे, वाहतूक नियंत्रण शाखेचे विठ्ठल दराडे तसेच शिक्षण विभाग आणि लातूर महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत शालेय परिवहन समिती आणि शाळा प्रशासनाला सर्व शालेय वाहनांची वाहन योग्यता प्रमाणपत्र, विमा, परवाना, पीयुसी, चालक अनुज्ञप्ती आदी कागदपत्रे वैध असल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, सर्व वाहनांवर स्पीड गव्हर्नर कार्यान्वित असल्याची तपासणी करावी. वैध कागदपत्रे नसलेली किंवा स्पीड गव्हर्नर नसलेली वाहने विद्यार्थी वाहतुकीसाठी वापरू नयेत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.
अवैधरित्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना मज्जाव करून त्यांची माहिती परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. अशा वाहतुकीत सहभागी शाळांवर शिक्षण विभागाने कारवाई करून अहवाल सादर करावा, असे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले.
****
Comments
Post a Comment