चाकूर येथे स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचा सहकार मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ आरोग्याची नियमित तपासणी करणे गरजेचे- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
चाकूर येथे स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचा सहकार मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्याची नियमित तपासणी करणे गरजेचे- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
चाकूर, दि. १८ : प्रत्येक व्यक्तीने आरोग्याविषयी सजग राहायला हवे. यासाठी आरोग्याची नियमित तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चाकूर येथे केले. चाकूर ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने आयोजित 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष करीम गुळवे होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक सारडा, डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. विवेक खुळे, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, शिवाजीराव काळे, उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे, माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आरोग्याची काळजी घेताना स्वच्छता ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. शासनाने ग्रामीण रुग्णालयांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या असून, मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेक रुग्णांना मदत केली जात आहे. कॅन्सरसारख्या आजारांवर आता अत्याधुनिक उपचार उपलब्ध असल्याने त्यावर मात करणे शक्य आहे. स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे सहकार मंत्री श्री. पाटील म्हणाले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी प्रास्ताविक केले, तर वैद्यकीय अधीक्षक जितेन जैस्वाल यांनी सूत्रसंचालन केले. महिला, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
*****

Comments
Post a Comment