राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात लातूरमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात
लातूरमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम
लातूर, दि. 26 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा’ साजरा होत आहे. यानिमित्ताने लातूर जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम राबविली जाणार आहे.
या मोहिमेदरम्यान अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील तसेच 2025-26 मधील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, सी.ई.टी. परीक्षा देणाऱ्या आणि डिप्लोमा तृतीय वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत वेबिनारचे आयोजन केले जाणार आहे.
समान संधी केंद्राद्वारे सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार असून, प्राप्त अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून जात वैधता प्रमाणपत्र प्रदान करण्याचे नियोजन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे. लातूर जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील विद्यार्थी आणि सी.ई.टी. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयामार्फत परिपूर्ण अर्ज सादर करून या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य बलभीम शिंदे यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment