जागतिक रेबीज दिन विशेष रेबीज निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

जागतिक रेबीज दिन विशेष रेबीज निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज रेबीज हा प्राण्यांपासून मानवाला होणारा झुनोटिक आजार आहे, जो विषाणूजन्य असून सर्व उष्म रक्ताच्या प्राण्यांना होऊ शकतो. या आजाराबाबत जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो. रेबीजची पहिली लस विकसित करणारे शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा दिवस पाळला जातो. यंदा “आत्ताच कृती करा: तुम्ही, मी, समुदाय” ही थीम आहे, जी रेबीज निर्मूलनासाठी व्यक्ती, समुदाय आणि सामूहिक कृतीवर भर देते. केंद्र शासनाने 2030 पर्यंत रेबीज निर्मूलनाचे ध्येय ठेवले आहे, ज्यामुळे या आजारामुळे होणारे मानवी मृत्यू थांबवून हा रोग कायमचा संपवण्याचा प्रयत्न आहे. रेबीजचा प्रसार आणि लक्षणे रेबीज हा तीव्र विषाणूजन्य रोग आहे, जो प्रामुख्याने पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याव्दारे पसरतो. भारतात 95 टक्के मानवी रेबीज प्रकरणांसाठी कुत्रे, तर 2 टक्के मांजरे आणि 1 टक्के कोल्हे, मुंगूस यांसारखे प्राणी जबाबदार आहेत. हा विषाणू लाळेतून चावणे, ओरखडे किंवा तुटलेली त्वचा चाटण्याद्वारे शरीरात प्रवेश करतो. विषाणू मज्जातंतूंमार्फत मेंदूपर्यंत पोहोचतो आणि साधारण दोन ते तीन महिन्यांत वाढतो. एकदा लक्षणे दिसू लागली की, हा रोग जवळजवळ नेहमीच प्राणघातक ठरतो. लक्षणांमध्ये सुरुवातीला ताप, डोकेदुखी, अंगदुखी, चिंता यांचा समावेश होतो, तर पुढे पाण्याची भीती, आक्रमक वर्तन, भ्रम, जास्त लाळ, डोळ्यांतून पाणी, घसा कोरडा पडणे, खाणे-पिणे बंद होणे यांसारखी लक्षणे दिसतात. शेवटी चेहऱ्याचे स्नायू निष्प्राण होतात, क्लेशदायक झटके येतात, रोगी बेशुद्ध होतो आणि 7 ते 10 दिवसांत मृत्यू पावतो. असा करता येईल रेबीजला प्रतिबंध रेबीजचा संसर्ग पिसाळलेल्या प्राण्याच्या चाव्याने, ओरखड्याने किंवा उघड्या जखमेला चाटण्याने होतो. हा आजार टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. जर एखाद्या प्राण्याने चावले तर जखम त्वरित साबण आणि वाहत्या पाण्याने धुवावी, त्यावर जंतुनाशक लावावे आणि ताबडतोब शासकीय रुग्णालयात जाऊन रेबीजविरोधी लस आणि उपचार घ्यावेत. लसीकरणाच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे आणि पाळीव प्राण्यांचे नियमित रेबीजविरोधी लसीकरण करावे. जखमेवर मिरची, तेल, चुना यांसारखे घातक पदार्थ लावणे किंवा उपचारासाठी उशीर करणे टाळावे. प्राण्यांच्या चाव्याचे योग्य आणि वेळीच व्यवस्थापन केल्यास रेबीजचा धोका मोठ्या प्रमाणात रोखता येऊ शकतो. कोणत्याही प्राण्याने चावल्यास तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. जागतिक रेबीज दिनानिमित्त, सर्वांनी एकत्र येऊन रेबीज निर्मूलनासाठी जागरूकता वाढवावी आणि त्वरित कृती करावी, असे आवाहन, लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन