सर सेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रमांतर्गत २१ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सर सेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रमांतर्गत २१ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. १७ (जिमाका) : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील युवक-युवतींसाठी 'सर सेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास (इनक्युबेशन) उपक्रम' राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पात्र युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत सारथीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन सारथी विभागीय कार्यालय उपव्यवस्थापकीय संचालक व उपजिल्हाधिकारी श्रीमती आम्रपाली कासोदेकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या लक्षित गटातील समाजाचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास साधण्यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली असून, संस्थेमार्फत विविध कल्याणकारी योजना व उपक्रम राबविले जातात. याच अनुषंगाने नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा इनक्युबेशन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, बारामती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणच्या एकूण १३ नामांकित इनक्युबेशन संस्थांची निवड करण्यात आली आहे. या निवडक १३ इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून प्रत्येकी १० नवउद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण उद्योजकीय संकल्पनांवर आधारित उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाणार आहे. या उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती, आवश्यक सूचना आणि संबंधित इनक्युबेशन संस्थांच्या स्वतंत्र लिंक सारथीच्या https://sarthi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरी मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील जास्तीत जास्त इच्छुक युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि उद्योजकतेच्या माध्यमातून स्वावलंबी होण्यासाठी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमती कासोदेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन