विशेष लेख : योजना ‘सारथी’च्या...संशोधनासाठी प्रोत्साहन देणारी ‘सारथी’ची छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती
राज्यातील
मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व
आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व
मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. 'शाहू
विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ हे ब्रीद
घेवून काम करणाऱ्या ‘सारथी’ संस्थेमार्फत विविध कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्याचे काम
केले जात असून या योजनांच्या माहितीवर आधारित क्रमशः लेखमालेचा हा पाचवा भाग...
राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजातील
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना विशेष
प्रोत्साहन देण्यासाठी ‘सारथी’मार्फत छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन
अधिछात्रवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेतून एम. फील. करणाऱ्या संशोधक
विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी प्रतिमहिना 31 हजार रुपये अधिछात्रावृत्ती दिली
जाते. तर पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना पहिल्या दोन वर्षामध्ये दरमहा
31 हजार रुपये आणि तीन ते पाच वर्षे कालावधीत दरमहा 35 हजार रुपये अधिछात्रवृत्ती दिली
जाते.
सामाजिक शास्त्रे
आणि मानव्य शास्त्रे शाखेतील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना पहिल्या दोन
वर्षासाठी प्रतिवर्ष 10 हजार रुपये आणि तीन ते पाच वर्षेपर्यंतच्या कालावधीत 20
हजार 500 रुपये आकस्मिक खर्चासाठी दिले जातात. तसेच विज्ञान, अभियांत्रिकी आणि
तंत्रज्ञान शाखेतील संशोधक विद्यार्थ्यांना पहिल्या दोनो वर्षासाठी 12 हजार रुपये
प्रतिवर्ष आणि पुढील तीन वर्षांसाठी 25 हजार रुपये प्रतिवर्ष आकस्मिक खर्चासाठी
दिले जातात. सर्व शाखेतील दिव्यांग संशोधक विद्यार्थ्यांना सहायकासाठी दरमहा 2
हजार दिले जातात. तसेच सर्व विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार घरभाडे भत्ता दिला
जातो.
अधिछात्रवृत्ती योजनेसाठी पात्रतेचे निकष
उमेदवार हा
महाराष्ट्रातील रहिवासी असावा. तसेच त्याच्याकड सक्षम प्राधिकरणाने दिलेले रहिवाशी
प्रमाणपत्र असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या कुटुंबाचे सर्व एकत्रित वार्षिक
उत्पन्न 8 लाख पेक्षा जास्त नसावे. अर्जासोबत सक्षम प्राधिकरणाद्वारे जारी केलेल नॉन-
क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. अर्ज भरण्याच्या दिवशी उमेदवाराकडे
कोणत्याही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच अर्ज करणाऱ्या
उमेदवाराकडे एम.फील. किंवा पीएच.डी.साठी आवश्यक नोंदणी झाल्याचे पत्र आवश्यक आहे.
अर्ज करणाऱ्या
उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. लक्षित गटातील महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव
राहतील, तसेच दिव्यांग बांधवांसाठी 3 टक्के आरक्षण राहील. या योजनेच्या सविस्तर
नियम व अटी ‘सारथी’च्या https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध
आहेत.
-
तानाजी घोलप, माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, लातूर
******

Comments
Post a Comment